भारतमातेचे महान सुपुत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य आणि समाजसेवा पुरस्कार’ दिला जाणार आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीचा विचार करता हा सोहळा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या फेसबूक पेजवर सावरकर प्रेमींना हा समारंभ पाहता येणार आहे.
या वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १३८ वी जयंती आहे. दार वर्षी या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर समाज सेवा पुरस्कार’ देण्यात येतो. या वर्षीचा शौर्य पुरस्कार हा गलवान घाटीमधील भारतीय लष्कराचे कर्नल बी. संतोष बाबू यांना मरणोत्तर देण्यात येणार आहे. तर समाज सेवा पुरस्कार हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, पुणे यांना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर हे यपस्थित राहणार आहेत. यावेळी ते ‘सावरकरांची विज्ञाननिष्ठा’ याविषयावर आपले विचार व्यक्त करतील.
हे ही वाचा:
इस्रायल-हमासमध्ये युद्धविराम जाहीर
आता दरवर्षी कोवॅक्सिनचे १ अब्ज डोस
धडधडीत खोटे बोलण्याचे धाडस, हा बहुदा सामना इफेक्ट
स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांची १३८ वी जयंती शुक्रवार दि. २८ मे २०२१ रोजी आहे. त्या दिवशी हा समारंभ सायंकाळी ७ वाजता होईल. या ऑनलाइन समारंभामध्ये ‘गलवान घाटीतील युद्ध’ या विषयावर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरचे मानद संचालक निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन तसेच त्या घाटीत प्राणाची बाजी लावणाऱ्या १६ बिहार रेजीमेंटबद्दल लेफ्टनंट जनरल अश्विनीकुमार बक्षी माहिती देतील. सदर कार्यक्रम सावरकर स्मारकाच्या फेसबुक पेजवर आणि युट्यूब चॅनेलवर पाहाता येणार आहे.