सौराष्ट्र संघाकडून खेळणारा भारताचा युवा क्रिकेटपटू अवि बरोट याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. अवि अवघ्या २९ वर्षांचा होता. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने त्याच्या निधनाची माहिती दिली आहे. भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचे त्याने प्रतिनिधित्व केले होते. रणजी स्पर्धेतील सौराष्ट्रच्या विजेत्या संघाचा तो एक भाग होता. याशिवाय, या वर्षी जानेवारीत खेळल्या गेलेल्या सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेतही त्याने सौराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते.
शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने अविचे निधन झाले आहे, अशी माहिती देत अवि बरोट याच्या निधनाबद्दल सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने तीव्र शोक व्यक्त केला आहे.
अवि बरोट हा यष्टीरक्षक आणि फलंदाज होता. या व्यतिरिक्त तो गोलंदाजीही करायचा. त्याने आपल्या कारकीर्दीत ३८ प्रथम श्रेणी सामने, ३८ लिस्ट ए सामने आणि २० देशांतर्गत टी- २० सामने खेळले आहेत. त्याने प्रथम श्रेणी कारकीर्दीत १५४७ धावा केल्या असून लिस्ट ए सामन्यांमध्ये १०३० धावा आणि देशांतर्गत टी- २० मध्ये ७१७ धावा केल्या आहेत. सौराष्ट्र संघासाठी त्याने २१ रणजी ट्रॉफी सामने, १७ लिस्ट ए सामने आणि ११ देशांतर्गत टी- २० सामने खेळले आहेत.
हे ही वाचा:
ब्रिटिश खासदाराची चाकूने भोसकून हत्या
मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यांकडे येणार का सरकारी पाहुणे?
रेल्वे प्रवासासाठी तिकीट नाहीच, पासच घ्यावा लागणार!
ईडी, एनसीबी, सीबीआयविरोधाचा राग पुन्हा पवारांनी आळवला
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयदेव शाह यांनी अवि बरोट याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ‘ही अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी आहे. बरोट एक चांगला खेळाडू होता, त्याच्याकडे क्रिकेटची खास शैली होती. नुकत्याच खेळल्या गेलेल्या सर्व देशांतर्गत सामन्यांमध्ये बरोटची कामगिरी अप्रतिम होती. तो एक चांगला माणूस आणि खूप चांगला मित्र होता. त्यांच्या अचानक जाण्याने सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनशी संबंधित प्रत्येकाला खूप दुःख झाले आहे,’ असे जयदेव शाह म्हणाले.