साधारण दीडशे वर्षांपूर्वी आजच्या दिवशी म्हणजेच २४ सप्टेंबर १८७३ साली ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना झाली. १८७३ साली महात्मा जोतिबा फुले आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या समाजाची आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक दुर्दशा संपवण्यासाठी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी समाज सुधारण्यासाठी मोठं काम केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भगवान बुद्ध आणि कबीरांसोबतच महात्मा जोतिबा फुले यांनाही आपले गुरू मानायचे.
सत्यशोधक समाजाची मुख्य उद्दिष्टे म्हणजे शूद्र- अतिशुद्रांना पुरोहित, व्याजदार इत्यादींच्या गुलामगिरीतून मुक्त करणे हे होते. धर्मग्रंथ त्यांना स्वतः वाचता यायला हवेत आणि ते समजले सुद्धा पाहिजेत, असा उद्देशसुद्धा होता. महात्मा फुले यांनी ज्या काळात हे कार्य केले. ते महत्त्वाचे आहे.
ईश्वर एक असून तो सर्वव्यापी, निर्गुण, निर्विकार व सत्यरूप आहे आणि सर्व माणसे त्याची लेकरे आहेत. या निर्मिकाशिवाय इतर कशाचीही पूजा करणार नाही. निर्मिकाची भक्ती करण्याचा पूर्ण अधिकार प्रत्येकाला आहे. त्यासाठी पुरोहित किंवा मध्यस्थाची आवश्यकता नाही. कोणीही जातीने श्रेष्ठ ठरत नसून, फक्त गुणाने श्रेष्ठ ठरतो, अशा काही तत्त्वांवर सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली होती.
सत्यशोधक समाजाचे सभासद होण्यासाठी समाजातील कुठल्याही जातीतील, तसंच धर्मातील व्यक्तींना मुभा होती. सत्यशोधक समाजाचे सभासद होताना प्रत्येक सभासदाला शपथ घ्यावी लागत असे. त्यानंतरच तो सत्यशोधक समाजाचा सभासद होत असे.
१८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची महात्मा जोतिबा फुले यांनी स्थापना केली. मात्र, समाज अधिवेशनांची सुरुवात १९११ पासून झाली. १९११ पासून २००७ पर्यंत सत्यशोधक समाजाची एकूण ३५ अधिवेशने संपन्न झाली. पाहिलं अधिवेशन १७ एप्रिल १९११ रोजी पुणे येथे स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावरू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. ३५ वे अधिवेशन २२ डिसेंबर २००७ रोजी गेवराई (जिल्हा बीड, मराठवाडा) येथे डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
ईश्वर एक असुन तो सर्वव्यापी निर्विकार, निर्गुण व सत्यरूप आहे हा वास्तव विचार १८ व्या शतकात निर्भीडपणे मांडून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक गुलामगिरीतून समस्त मानवाला बाहेर काढण्याचं काम करणारे अशी ओळख महात्मा जोतिबा फुले यांची आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्रांतीची ज्योत पेटविणारे महात्मा ज्योतिबा फुले ही ओळखही त्यांची आहे. या समाजातील तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाई यांच्याबरोबर १९ स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य सुरू केले. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत ही चळवळ पोहोचली. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीला पाठिंबा दिला होता.
महात्मा जोतिबा फुले
साताऱ्यातील कटगुण या गावी ११ एप्रिल १८२७ रोजी जोतिबा फुले यांचा जन्म झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. महात्मा फुले यांचे वडील फुले पुरवण्याचे काम करत होते. त्यामुळे गोरे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले आणि तेच नाव पुढे रूढ झाले. वयाच्या १३ व्या वर्षी जोतिबांचा विवाह सावित्रीबाई यांच्याशी झाला. १८४२ मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्यातील स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. अतिशय तल्लख बुद्धीमुळे पाच- सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.
हे ही वाचा:
शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची उद्धव ठाकरेंना परवानगी
गणेश रामदासी ‘मराठवाडा भूषण’चे मानकरी
एनआयएच्या कारवाईनंतर पीएफआयकडून केरळमध्ये तोडफोड
बारावीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना करता येणार नोकरी
१८४८ मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत असणाऱ्या भिडे वाड्यात मुलींची पहिली मराठी शाळा जोतिबांनी स्थापन केली. या शाळेतील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यावर सोपवली. यानंतर जोतिबांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या. त्यांनी समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. १८४८ ते १८५२ पर्यंत पुण्यात सर्व जाती धर्माच्या मुला- मुलींना, स्त्री-पुरूषांना शिकता यावं म्हणून जवळपास १८ शाळा आणि १ प्रौढ शाळा सुरू करण्यात आली होती. त्या काळात बालविवाह व्हायचे. तसेच तरुण वयात विधवा झालेल्या स्त्रियांना पुनर्विवाहाचा अधिकार नव्हता. त्यांनी विधवा स्त्रियांचा पुनर्विवाह घडवून आणायचे ठरवले. फुले यांनी हिंदु स्त्रीला तिच्या जुनाट बंधनातून मुक्त करण्यासाठी ५ मार्च १८६४ रोजी पुण्यातील गोखले यांच्या वाड्यात रघुनाथ जनार्दन व नर्मदा या दोघांचा पहिला पुनर्विवाह स्वहस्ते लावला.
जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन जनतेने त्यांना मुंबईतील एका सभेत १८८८ मध्ये ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे जोतिबा फुले हे ‘महात्मा फुले’ या नावाने ओळखले जाऊ लागले.