चिराग शेट्टी आणि सात्विकराज रांकीरेड्डीने पुन्हा फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. त्यांनी रविवारी पोर्ट डे ला चॅपेल एरेना येथे झालेल्या अंतिम सामन्यात ली झे हुएई-यांग पो सुआन या चीन तैपेईच्या जोडीला २१-११,२१-१७ असे सहज पराभूत केले. भारतीय जोडीने यापूर्वी ही स्पर्धा सन २०२२मध्ये जिंकली होती. त्यांनी उपांत्य फेरीत जागतिक विजेत्यांना पराभूत केले होते.
चिराग आणि सात्विकराजच्या जोडीने अवघ्या ३७ मिनिटांत हा सामना खिशात टाकून या वर्षीच्या पहिल्यावहिल्या विजेतेपदाला गवसणी घातली. हा सामना जगातील अग्रमानांकित चिराग सात्विकची जोडी आणि चीन-तैपेईची १७व्या क्रमांकाची जोडी यांच्यात होता. सुरुवातीला हा सामना अत्यंत चुरशीचा झाला. मात्र जेव्हा भारताने ४-३ अशी आघाडी घेतली, तेव्हा त्यांनी सामन्यावरील पकड निसटू दिली नाही. त्यामुळे ही आघाडी ८-४पर्यंत वाढत गेली आणि अखेर ११-५पर्यंत पोहोचली. त्यानंतर भारताला १५-८ अशी आघाडी मिळाली. अखेर २१-११ अशी आघाडी मिळवत भारताने विजयाचा मार्ग सुकर केला.
दुसऱ्या गेममध्ये यांग-ली जोडीने जोरदार मुसंडी मारली. जर्मन ओपन चॅम्पियन विजेत्या जोडीने १३-११ अशी आघाडी घेतली होती. मात्र सात्विक आणि चिराग जोडीने पुनरागमन करून पुढच्या सहापैकी पाच पॉइंट खिशात टाकून ही आघाडी १६-१४ अशी केली. त्यानंतर ती १९-१५ अशी पोहोचली. त्यानंतर त्यांनी २१-१७ असे गुण मिळवत फ्रेंच ओपन काबीज केले.
हे ही वाचा..
बजरंग पुनिया, रवी दाहिया पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर?
शाहजहान शेखवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा
दोन हजार कोटींचे ड्रग्ज; उदयनिधी स्टॅलिनना सात लाखांचा वाटा दिल्याचा आरोपीचा दावा
सात्विक-चिरागच्या जोडीला सन २०१९मध्ये या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर त्याने सन २०२२मध्ये ही स्पर्धा जिंकली. ते सलग चौथ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडकले आहेत. मात्र त्यांनी पॅरिसमध्ये मागील तीन विजेतेपदाच्या लढती गमावल्या होत्या.पॅरिसमध्ये झालेल्या पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत सात्विक आणि चिराग यांनी विद्यमान विश्वविजेत्या कांग मिन्ह्युक आणि कोरियाच्या सेओ सेउंगजे यांच्यावर २१-१३, २१-१६ असे वर्चस्व राखून फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले होते.
या जोडीने थायलंडच्या जागतिक क्रमवारीत ३२व्या क्रमांकावर असलेल्या सुपाक जोमकोह आणि किटिनुपोंग केद्रेन यांच्यावर २१-१९, २१-१३ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.या वर्षाच्या अखेरीस २०२४ पॅरिस ऑलिम्पिक खेळले जाणार आहे, त्याच ठिकाणी भारतीय जोडीने विजेतेपद पटकावले. भारताच्या या जोडीने गेल्या वर्षी मलेशिया सुपर १००० आणि इंडिया सुपर ७५०मध्ये उपविजेतेपद पटकावले होते, तर गतवर्षीही चायना मास्टर्स सुपर ७५०मधील अंतिम सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.