ठोसे बसले…टाके निघाले…पण सतीश लढत राहिला!

ठोसे बसले…टाके निघाले…पण सतीश लढत राहिला!

भारताचा हेवीवेट बॉक्सर (९१ पेक्षा अधिक किलो वजन) सतीश कुमारला टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला असला तरी त्याने दाखविलेल्या शौर्याचे देशभरात कौतुक होते आहे.

उपउपांत्यपूर्व फेरीत सतीशकुमारच्या उजव्या डोळ्यावर आणि हनुवटीला जखमा झाल्या होत्या. त्या जखमांना १३ टाके घालण्यात आले होते. जमैकाच्या रिकार्डो ब्राऊनविरुद्धच्या लढतीत सतीश जखमी झाला होता. पण त्याने जखमी होऊनही माघार घेतली नाही. पुढच्या लढतीत टाके घातलेल्या अवस्थेतच तो रिंगमध्ये उतरला. उझबेकिस्तानच्या बाखोदिर जोलोलोव्हविरुद्धच्या या सामन्यात त्याच्या उजव्या डोळ्यावर झालेल्या जखमेतून रक्त येऊ लागले. ते प्रतिस्पर्धी खेळाडूच्या खांद्यालाही लागले. या लढतीत शेवटी सतीश कुमार ०-५ अशा फरकाने पराभूत झाला. पण आपल्या जखमा उघडतील आणि आपण आणखी अडचणीत सापडू हे ठाऊक असतानाही त्याने रिंगमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. भारतीय सेनादलात असल्यामुळे ती चिकाटी आणि जिद्द त्याने रिंगमध्ये दाखविली. त्याने दाखविलेल्या या जिद्दीचे उझबेकिस्तानच्या खेळाडूनेही कौतुक केले. विजयी झाल्यानंतर त्याने सतीश कुमारला कडकडून मिठी मारली.

हे ही वाचा:
‘बिर्याणी’चे पोस्टमॉर्टेम करा!

भारतीय महिला हॉकीपटूंची ऐतिहासिक कामगिरी! उपांत्य फेरीत धडक

…आणि दोघांनीही विभागून घेतले सुवर्णपदक

आता आर या पार! गोंधळ संपवा, निर्णय घ्या!

सतीश कुमार भारताचा एकमेव बॉक्सर होता ज्याने पहिली फेरी पार करत दुसऱ्या फेरीत धडक मारली होती. बाकी बॉक्सर पहिल्याच फेरीत पराभूत झाले.

सतीश कुमार सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. पण तो पराभूत झाल्यानंतरही त्याला असंख्य फोन आले. लोकांनी त्याच्या या शौर्याचे कौतुक केले. तो म्हणाला की, माझ्या कपाळावर सहा टाके आहेत आणि हनुवटीला सात टाके घालण्यात आले आहेत. पण जर मी माघार घेतली असती तर त्याचे शल्य कायम माझ्या मनाला लागून राहिले असते. म्हणून मी जखमी असतानाही रिंगमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला.

Exit mobile version