गेल्या अडीच वर्षांच्या पाठपुराव्यानंतर आज कांदिवली पूर्व रेल्वे स्थानकातील स्वयंचलित जीना सुरु झाला. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतरच हे काम पूर्ण झाले. आम्ही केलेल्या संघर्षाला यश आले, असे प्रतिपादन भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केले. या स्वयंचलित जिन्याचे लोकार्पण आमदार भातखळकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आमदार भातखळकर म्हणाले, कांदिवली पूर्व रेल्वे स्थानकातील हा जीना सुरु करण्यात यावा, यासाठी खूप संघर्ष केला. नागरिकांची होणारी गैरसोय दूर व्हावी, यासाठी सतत पाठपुरावा केला. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले. महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांची प्रचंड अडचण होत होती. तरी महापालिकेची उदासीनता होती. म्हणून आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष केला. धरणे आंदोलन केले. मात्र राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर या कामाला गती मिळाली. आज अखेर हा जीना सुरु झाला आहे. या जीन्यामुळे असंख्य प्रवाशांना दिलासा मिळणार आहे, याचे समाधान वाटते.
आमदार भातखळकर म्हणाले, काही महिन्यांपुर्वी या स्वयंचलित जिन्याच्या कामाचे भूमिपूजन मी केले होते, तेव्हाच हे काम निर्धारित वेळेत पूर्ण व्हावे, अशा सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या होत्या. वारंवार कामाबद्दलची ताजी माहिती माहिती घेत होतो. येणाऱ्या अडचणी दूर करण्यास मदत केली, त्यामुळे हे काम होऊ शकले. आजपासून याचा वापर सामान्य नागरिकांना होऊ लागल्यामुळे नागरिकांनीही समाधान व्यक्त केल्याचे ते म्हणाले. यावेळी कांदिवली पूर्व परिसरतील ज्येष्ठ नागरिक, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.