बॉलिवूडमधील ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतींदर कुमार खोसला यांचे मंगळवारी निधन झाले. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हिंदी सिनेसृष्टीत त्यांची ‘बिरबल’ या नावाने ओळख होती. गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान मंगळवारी सायंकाळी सतींदर यांची प्राणज्योत मालवली. बुधवार, १३ सप्टेंबर रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
चित्रपटसृष्टीतील कलाकारांसह अनेकांनी सतींदर कुमार खोसला यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ‘सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन’ने (CINTAA) ट्वीट करून बिरबल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
सातींदर यांची कारकीर्द
सतींदर यांचा जन्म २८ ऑक्टोबर १९३८ रोजी पंजाबमध्ये झाला होता. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटामध्ये विनोदी पात्र साकारले आहे. सतींदर यांनी पंजाबी भाषेसह भोजपुरी, मराठी आणि हिंदीमध्ये देखील अभिनय केला आहे. १९६६ मध्ये ‘दो बंधन’ आणि १९६७ मध्ये मनोज कुमारच्या ‘उपकार’ चित्रपटातून सतींदर यांनी हिंदी सिनेसृष्टीमध्ये करियरची सुरुवात केली. कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्यांना अभिनयामध्ये आवड होती. शिक्षणाऐवजी सतींदर यांना भांगडाच्या कार्यक्रमध्ये आणि नाटकांमध्ये सर्वाधिक आवड होती. त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दिमध्ये जवळपास ५०० हून जास्त अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
हे ही वाचा:
विवाहित प्रियकराने प्रेयसीला बुडवून मारले, दोन जण अटकेत
जवानाचे रक्षण करताना सहावर्षीय लष्करी कुत्र्याचा मृत्यू
पंतप्रधान मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाची पुतीन यांना भुरळ
डीएमकेने स्पष्टच सांगितले की, सनातन धर्म नष्ट करणे हाच इंडी आघाडीचा उद्देश
सतींदर यांना चाहते ‘शोले’ चित्रपटामुळेच ओळखतात. शोलेमधल्या लूकमुळे त्यांची आजही चर्चा होते. ‘तपस्या’, ‘मेरा गांव मेरा देश’, ‘चार्ली चॅप्लिन’, ‘अनुरोध’, ‘अमिर गरीब’, ‘सदमा’, ‘हम हैं राही प्यार के’, ‘जुगारी’, ‘फिर कभी’, ‘मिस्टर अँड मिसेस’, ‘खिलाडी’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये सतींदर यांनी काम केले आहे. सतींदर यांनी मनोज कुमार, राजेश खन्ना, जितेंद्र, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी आणि मुमताज सारख्या बड्या सेलिब्रिटींसोबत सुद्धा त्यांनी काम केलं होतं. मनोज कुमार आणि दिग्दर्शक राज खोसला यांनी सतींदर यांचे नाव बदलून बिरबल ठेवले होते, अशी चर्चा सध्या होत आहे. ते शेवटचे २०२२ मध्ये आलेल्या ‘१० नही ४०’ मध्ये दिसले होते.