सोमवार, १५ नोव्हेंबर रोजी बाबासाहेब पुरंदरे यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेबांच्या निधनावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दुःख व्यक्त होताना दिसत आहे. समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना आदरांजली वाहताना आपण एका एका शतायुषी शिव ऋषीला मुकलो आहोत अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
आपल्या शोक संदेशात सरसंघचालक म्हणतात, “पद्मविभूषण व महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त आदरणीय श्री. बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने आपण सर्वच एका शतायुषी शिव ऋषीला मुकलो आहोत. तरुण वयापासूनच देशभक्तीचा वसा त्यांना संघ शाखेतून प्राप्त झाला. तो ध्यास मनात ठेवून ध्येय प्राप्ती करिता तत्व रूप आदर्श पुरुष म्हणून छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराज यांची भक्ती त्यांनी जीवनभर निष्ठेने चालवली.
हे ही वाचा:
बाबासाहेब त्यांच्या साहित्यातून कायमच जिवंत राहतील
बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनावर शरद पवारांची वादग्रस्त प्रतिक्रिया
महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन
शिवप्रेमींची बाबासाहेबांच्या अंत्यदर्शनाला अलोट गर्दी; राजकीय नेत्यांनीही घेतले दर्शन
दादरा नगर हवेलीच्या मुक्तिसंग्रामात सैनिक म्हणून तेहि लढले होते. शिवाजी महाराजांची कथा आपल्या वक्तृत्वाच्या बळावर त्यांनी घराघरात पोहोचवली. त्यासाठी जीवनभर असंख्य परिश्रम केले. अत्यंत कठीण परिस्थितीतून केलेल्या या वाटचालीतुनच “जाणता राजा” सारख्या भव्य व प्रेरक नाट्य शिल्पाची निर्मिती त्यांनी केली. त्या देशभक्त व परिश्रमी शिवशाहीर यांचे पार्थिव जरी दृष्टीआड झाले तरी त्यांचे स्फूर्तीदायक जीवन “समाजामध्ये पिढ्यानपिढ्या शिवरायांचा प्रताप व प्रेरणा सतत जागृत ठेवील. त्यांच्या पवित्र व प्रेरक स्मृतीला माझी व्यक्तिगत व राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विनम्र श्रद्धांजली.”