सलग तीनवेळा देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांत १००हून अधिक सरासरीने फलंदाजी करणारा सरफराज खान अखेर भारताच्या कसोटी संघातून पदार्पण करणार आहे. इंग्लंडविरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्याआधीच त्याला भारताच्या कसोटीसामन्यासाठी निवडण्यात आले होते आणि आता मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांसाठी तो संघाचा भाग असेल. राजकोटमध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासह तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पदार्पण करण्याच्या मार्गावर आहे. तर, ध्रुव जुरेलही या सामन्यात पदार्पण करेल, अशी शक्यता आहे.
पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांसाठी मधल्या फळीत श्रेयस अय्यर नाही. तसेच, दुखापतीमुळे केएल राहुलही खेळू शकत नाही. त्यामुळे सरफराज खान याला कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते. विराट कोहलीच्या अनुपस्थित पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी निवडकर्त्यांनी रजत पाटिदार याला निवडले होते. मात्र या २६ वर्षीय क्रिकेटपटूने आशा सोडली नाही. निवडकर्त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्याने इंग्लंड लायन्सविरुद्ध १६१ धावा केल्यानंतर पुन्हा स्वतःकडे लक्ष वेधले. आता मधल्या फळीत दोन फलंदाज नसल्याने सरफराज याचे कसोटी पदार्पण होऊ शकते.
हे ही वाचा:
हिल्द्वानीमध्ये हिंसाचारानंतर ५०० कुटुंबांनी सोडले घर
इंडोनेशियातील फुटबॉल सामन्यादरम्यान खेळाडूवर वीज कोसळली
केरळच्या सत्ताधारी खासदाराने मोदींसह घेतले जेवण!
रामायण, महाभारत काल्पनिक असल्याचे धडे दिल्यानंतर बंगळूरूमध्ये शिक्षिकेचे निलंबन
तिसऱ्या कसोटी सामन्यात ध्रुव जुरेलही पदार्पण करू शकतो. १५ फेब्रुवारी रोजी राजकोट येथे होणाऱ्या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून केएस भरत नाही तर ध्रुव जुरेल याला संधी मिळू शकते.
भारताचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ
यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटिदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल, रवींद्र जाडेजा, आर. आश्विन, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज/मुकेश कुमार