उत्तर भारतीय संघाच्या कार्यकारी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत संतोष आर एन सिंह यांना उत्तर भारतीय संघाच्या अध्यक्षपदी निवडले गेल्याची घोषणा करण्यात आली. भाजपाचे आमदार आर एन सिंह यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. ते १९९६ ते २०२२ असे सुमारे २६ वर्षे अध्यक्षपदी विराजमान होते. आर एन सिंह यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत उत्तर भारतीय संघ भवन, पदवी महाविद्यालय, कर्करुग्णांसाठी आणि यात्रेकरूंसाठी अतिथीगृह यासारख्या महत्त्वाच्या वास्तूंची उभारणी केली. त्यांनी आपल्या कार्यकाळात संघाच्या माध्यमातून कोरोना रुग्णांसाठी तसेच गरिबांना मदत केली. त्यांना आश्रय देण्याबरोबरच रक्ताची गरज भासली असताना एक हजार बाटल्या रक्त ही जमा करण्यात आले होते. मुंबईमध्ये बालपण गेलेल्या आणि शिक्षण घेतलेले संतोष सिंह हे बॉम्बे इंटेलिजेंस सिक्युरिटी लिमिटेड या कंपनीचे संचालक आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून ते उत्तर भारतीय संघाच्या माध्यमातून कार्यरत आहेत.
५१ लाख रुपयांची संघाला देणगी
वांद्रे पूर्व येथे असलेल्या उत्तर भारतीय संघ भवनामध्ये संघाच्या कार्यकारणीच्यावतीने स्वर्गीय आर एन सिंह यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी आर एन सिंह यांनी संघासाठी केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची उजळणी करण्यात आली. आर एन सिंह यांनी संघासाठी ज्या पद्धतीने कार्य केले ते गौरवास्पद आणि अभिमानास्पद होते, असे मत सर्वांनी व्यक्त केले. तसेच कर्करुग्णांसाठी आणि यात्रेकरूंसाठी तयार करण्यात आलेल्या अतिथिगृहाला आर एन सिंह यांचे नाव देण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला. तसेच प्रत्येक वर्षी आर एन सिंह यांच्या जन्मदिनी उत्तर भारतीय स्वप्न साकार दिवस साजरा करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
यावेळी बोलताना संतोष सिंह म्हणाले की हा माझ्यासाठी अतिशय भावुक क्षण आहे. संघाने माझ्यावर विश्वास दाखवत माझी अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मी खूप आभारी आहे. संघाने दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवेन. तसेच माझे वडील आर एन सिंह असताना संघाच्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला होता की, ज्या व्यक्तीच्या नावे अतिथीगृह उभारले जाईल. त्या व्यक्तीने अथवा त्यांच्या परिवाराने ५१ लाख रुपये देणगी द्यावी. संघाच्या त्या ठरावाचा मी आदर राखत ५१ लाख रुपयांची देणगी देण्याचे वचन देतो.
उत्तर भारतीयांचा मानसन्मान वाढवण्याचा प्रयत्न
नवनियुक्त अध्यक्ष संतोष सिंह यांनी सांगितले की, आपले वडील नेहमी म्हणायचे कार्य करा आणि पुढे चला. समाजातील गरीब वर्गाला नेहमी मदतीचा हात द्या. मी त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांना पूर्ण करेन आणि नेहमी समाजासाठी कार्यरत राहील. संघाच्या वरिष्ठांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनानुसार काम करीन तसेच आपले मूळ गाव असलेल्या भरौली येथेही गरिबांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी एक रुपयांमध्ये डायलिसिस सेंटरची सुविधा मिळावी यासाठी डायलिसिस सेंटर उभारण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही संतोष सिंह यांनी सांगितले. तसेच दरवर्षी अनाथ तरुण-तरुणींचे सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.