उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांना चोख प्रत्युत्तर देणारे नितेश राणे यांनी विविध मुद्द्यांवर पुन्हा एकदा राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. संजय राऊत नव्या संसद भवनावर टीका करत असतील पण त्यांना हे नवे संसद भवन बघायला तरी मिळते का ते माहीत नाही, अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली.
संजय राऊत हे संसद भवनाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत, त्याला नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे गटाचा एकही खासदार आता निवडून येणार नाही, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले त्यावर नितेश राणे म्हणाले की, आधी संजय राऊत यांना नवे संसद भवन बघायला मिळते का ते पाहा. ते माजी खासदार असतील. शिंदे यांच्यासोबतचे खासदार चार चार वेळा निवडून आले आहेत, तुमच्या मालकांप्रमाणे निवडून आलेले नाहीत.
संसद भवनाच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावर राऊत यांच्या विधानाला नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, जेव्हा सुमित्रा महाजन लोकसभा अध्यक्ष होत्या आणि जेव्हा एनडीए होती तसेच उद्धव ठाकरे एनडीए मध्ये होते तेव्हाच सर्वांच्या सहमतीने घेतलेला हा निर्णय आहे. ब्रिटिशांनी बांधलेली ही इमारत आणि ब्रिटिशांची आठवण आम्ही आजून किती वर्ष ठेवायची, आपण नवीन भारत म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर विरोधकांना लगेच जळजळ होत असल्याने विरोधक सातत्याने टीका करत आहेत. संसद भवनाच्या नव्या इमारतीच्या उदघाटनावरून संजय राऊतांनी राष्ट्रपतींचा अपमान केला जात असल्याचे म्हटले होते.
त्यावर राणे म्हणाले ,संजय राऊत हे रोज सकाळी ज्या पद्धतीने गरळ ओकण्याचं काम करतात. एकंदरीत देशाचे जे-जे संविधानिक पद, संविधानिक संस्था आहेत त्यावर सातत्याने हल्ले चढवायचे, त्या पदांबद्दल अविश्वास निर्माण करायचा, देशाला सातत्याने अस्थिर ठेवायचे अशाच पद्धतीने संजय राऊत रोज बोलताना दिसतात. जयंत पाटील यांच्यावर संजय राऊत यांनी लिहिलेल्या अग्रलेखावरूनही नितेश राणे यांनी निशाणा साधला.
जयंत पाटील यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर त्यावर संजय राऊत यांनी अग्रलेख लिहिला मग अजित पवार यांच्यावर अशी कारवाई झाली तेव्हा का अग्रलेख लिहिला नाही, असा खणखणीत सवाल नितेश राणे यांनी विचारला. ते म्हणाले की, उलट अजित पवारांच्या विरोधात जाऊन संजय राऊत म्हणाले होते, अजित पवार बॅग भरून भाजप मध्ये जात आहेत, असे विधान राऊत यांनी केले होते. संजय राऊत हे शकुनीमामा आहेत. त्यांना काही काम नाही. नुसते काड्या लावण्याचे काम ते करत आहेत.
हे ही वाचा:
गुजरातला एक ‘नो बॉल’ पडला महागात; ऋतुराजने चित्र बदलले
संसद भवनाच्या उद्घाटनाला स्थापित होणाऱ्या राजदंडावर ‘नंदी’ विराजमान
मिर्झापूरमध्ये हिंदू असल्याचे भासवून केली महिलेची फसवणूक, लव्ह जिहादचा प्रकार
‘आदित्य राजपूतबाबत चुकीच्या बातम्या देऊ नका!’
पंतप्रधान मोदी यांचा बाहेरील देशातील दौरा देदिप्यमान ठरला. आपल्या देशाला एवढा बहुमान मिळत असेल तर यावर आपल्याच देशातील काही लोक जसे संजय राऊत नमकहराम, देशद्रोही अशा लोकांना पाहवत नाही. संजय राऊत हे रोज सकाळी उठून पंतप्रधान ,राज्यपाल यांच्यावर टीका करण्याचं काम करतात असे राणे म्हणाले.
नितेश राणे म्हणाले, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळा पूर्ण करण्याचा कधी विचार केला काय ? देशाचे पंतप्रधान आपल्या देशासाठी काही तरी करत आहेत. ते देशाला बहुमान मिळवून देण्याचं काम करत असताना राऊतांना मिर्च्या झोंबत आहेत का? असा प्रश्न राणेंनी संजय राऊतांना केला. नवाब मलिक याचे संबंध डॉन दाऊदशी होते, हाच दाऊद बाळासाहेब ठाकरेंना मारण्याचा आराखडा तयार करत होता.आणि यांची संजय राऊत बाजू घेत असेल तर ”तुमच्या शिवाय बेईमान कोणी असू शकत नाही” , असे नितेश राणे म्हणाले.
समीर वानखेडे यांच्या झालेल्या कारवाईबद्दल म्हणाले, नरेंद्र मोदींनी पहिल्यापासूनच सांगितलंय ”न खाऊंगा ना खाने दूँगा ” त्यामुळे कोणीही अधिकारी लाच घेत असेल तर त्यावर कारवाई होणारच.
आदित्य ठाकरेंना सोबत गुंड का लागतात?
आदित्य ठाकरेंच्या नागपूर दौऱ्यावर राणे म्हणाले, ठाकरे कुटुंब दौऱ्यावर जाताना गुंडाना सोबत घेऊन जातात. आदित्य ठाकरेंसोबत बाजूला उभा असलेला एका व्यक्तीचा फोटो दाखवत राणे म्हणाले, ह्या व्यक्तीवर अनेक गुन्हे दाखल आहेत.अशा गुंडाना जनतेला घाबरवण्यासाठी घेऊन जात असल्याचं, राणे म्हणाले.अशा गुंडाना घेऊन जाण्याचं कारण काय ? याच उत्तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी द्यावं , असेही राणे म्हणाले.
आता पर्यंत महाराष्ट्राला एकही महिला मुखमंत्री नाही असे विचारले असता ते म्हणाले, कर्नाटकातील काँग्रेसच्या सरकारमध्ये एकाही महिलेने शपथ घेतली का? याच उत्तर काँग्रेसच्या महिला यशोमती ठाकूर, रुपाली चाकणकर, प्रणिती ताई यांनी द्यावं. ”स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून ”अशी विरोधकांची भूमिका आहे,असे राणे म्हणाले. संसद भवन इमारतीच्या उद्घाटन समारंभाला राष्ट्रवादीच्या खासदारांनी जाण्याचे टाळले आहे. त्यावर राणे म्हणाले, संसद भवनाच्या कार्यक्रमाला जे-जे विरोध करणारे आहेत ते सर्व देशद्रोही आहेत.असे राणे म्हणाले.