असभ्य भाषेची राऊत यांना आता शरम वाटू लागली…

संजय राऊत यांनी सभ्य भाषेबद्दल सल्ला देणे आश्चर्यजनक

असभ्य भाषेची राऊत यांना आता शरम वाटू लागली…

कलंक या शब्दावरून गेले काही दिवस महाराष्ट्रातील राजकारण तापले. उद्धव ठाकरे यांनी सभेदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना कलंक शब्दाचा वापर केला आणि मग फडणवीसांनीही त्याला उत्तर दिले. त्यावरूनच खासदार संजय राऊत यांनी कलंक शब्दाचे महाभारत याविषयावर प्रदीर्घ लेख लिहिला. मात्र त्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लेखामध्ये त्यांनी अशा प्रकारची विधाने करणाऱ्या राजकीय नेत्यांबद्दल आपल्याला शरम वाटत असल्याचे आणि राजकीय नेत्यांनी भारदस्तपणा, सभ्य भाषेचा वापर, उदार अंतःकरण ठेवले पाहिजे हे सांगायलाही ते विसरले नाहीत. संजय राऊत यांनी हा सल्ला देणे आश्चर्यजनक नक्कीच आहे. कारण स्वतः संजय राऊत यांनी अशा प्रकारचा सल्ला देणे म्हणजे निश्चितच कुणालाही आश्चर्य वाटावे असेच आहे.

 

राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार आल्यापासून या सरकारची बाजू मांडण्याचे काम केलेले आहे.पण हे करताना त्यांनी अनेकवेळेला कमरेखाली वारही केले आहेत. त्यात अनेकदा अशा शब्दांचा वापर केला आहे, जी भाषा सर्वसामान्य, सभ्य माणसालाही लाज आणू शकेल. असे असताना आज त्यांना आज राजकीय नेत्यांना सभ्य भाषेचा वापर, शरम या गोष्टींचा उल्लेख करावासा का वाटतो?

हे ही वाचा:

जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला, हंडवारामध्ये ३३ वर्षांनी उघडली चित्रपटगृहे

शुभमन गिलला झुकते माप का दिले जात आहे?

मोमो खाण्याच्या पैजेनंतर तरुणाचा मृत्यू

लिओनेल मेस्सी अधिकृतपणे इंटर मियामीमध्ये दाखल

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत ४० आमदार बाहेर पडल्यानंतर तर संजय राऊत यांची भाषा अधिक खालच्या पातळीवर पोहोचली. त्यांनी ज्या पद्धतीने शिव्यांची लाखोली या आमदारांना वाहिलेली आहे ती पाहता यापेक्षा असभ्य भाषा महाराष्ट्राच्या राजकरणात कधी वापरली गेली नसावी. मध्यंतरी तर एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला तेव्हा ते बाजुला थुंकलेही. ती महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक शरम आणणारी गोष्ट होती. पण तेव्हा संजय राऊत यांना त्याची फारशी जाणीव झाली नसावी. अर्थात, एकनाथ शिंदे किंवा त्यांच्यासोबत बाहेर पडलेले आमदार संजय राऊत यांच्याबद्दल किंवा विरोधी पक्षाबद्दल टीका जरूर करतात पण त्यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका करत नाहीत. शिंदेंबद्दल मिंधे गट म्हणणे, त्यांना गद्दार म्हणणे, भ्रष्टाचाराचे आरोप करताना पातळी ओलांडून टीका करणे, पालापाचोळा, नरबळी, गटार, मृतदेह अशा कशाचीही उपमा देऊन अपमानित करणे हे संजय राऊत यांनी केलेले आहे. त्यामुळे आता त्यांनी सर्व राजकारण्यांना असभ्यतेच्या मर्यादा काय आहेत, हे सांगणे हास्यास्पद ठरते.

 

संजय राऊत आपल्या या लेखात लिहितात की, माझ्यासारख्यांना अशा असभ्य शब्दांची शरम वाटते. तेव्हा मग संजय राऊत यांना कुणालाही विचारावेसे वाटेल की, मग त्या प्रत्येकवेळी तुम्हाला याची जाणीव का झाली नाही. एका महिलेशी बोलतानाचा जो ऑडिओ व्हायरल झाला त्यातील भाषा कोणत्या सभ्यतेत मोडणारी होती. बरे यापूर्वीही संजय राऊत यांच्याकडून वापरल्या जाणाऱ्या भाषेबद्दल अनेक प्रकारे टीका झालेली आहे. पण त्यातून संजय राऊत यांच्या वर्तनात फरक पडलेला दिसत नाही.

 

आज फडणवीस यांच्याबाबतीत कशाप्रकारे टीका केली जाते हे सर्वसामान्य जनता पाहतेच पण त्याला उत्तर देताना फडणवीसांनी कधी मर्यादेचे उल्लंघन केल्याचे दिसले नाही. त्यांच्या शरीरावरून, पत्नीवरून त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला पण त्यानंतरही त्यांनी आपली मर्यादा पाळलेली आहे. मग असे असताना राजकारणाची ही पातळी खाली कुणी आणली याचा विचार व्हायला हवा.

 

संजय राऊत यांनी प्रवक्ते म्हणून आपल्या मर्यादांचे पालन केले नाही, हे स्पष्ट आहे. तसे पाहिले तर नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून त्यांच्यावरही अशाच अश्लाघ्य भाषेचा वापर केला गेला आहे. चौकीदार चोर है पासून मौत का सौदागर असे अनेक आरोप झाले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही मोदी शब्दाचा वापर करत त्यांचा अपमान केला. त्यातूनच त्यांची खासदारकी गेली, बंगला गेला आणि आता न्यायालयात खेटे घालण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत राहुल गांधी यांचे ‘विचार’ नेहमीच ऐकायला मिळत असतात. त्यात कोणत्या सभ्य भाषेचा वापर असतो हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यांना याबद्दल याच सभ्यतेच्या मर्यादा राऊत यांनी स्पष्ट केल्याचे मात्र ऐकिवात नाही.

 

अर्थात, संजय राऊत यांना हे ठाऊक नाही असे नाही. पण तरीही ते अशा भाषेचा वापर कायम करत आले आहेत. खरे तर त्यांनी हा सल्ला आधी स्वतः अमलात आणणे आणि आपल्या पक्षातील नेत्यांना देत आम्ही यापुढे अशा शब्दांचा वापर करणार नाही, असे आश्वासन द्यायला हवे. पण तसे ते करतील असे वाटत नाही. एक मात्र खरे की, २०१९मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जी कटुता वाढली त्यातून फडणवीस आणि त्यांच्यासोबत आज गेलेले शिंदे यांच्यावर ही चिखलफेक वाढली. आपल्या हातून सगळे बघता बघता निसटले हे पचविणे विरोधकांना विशेषतः उद्धव गटाला शक्य झालेले नाही. त्यातून ही सभ्यतेची मर्यादाही ते विसरले आहेत. संजय राऊत यांनी आता स्वतः ती अमलात आणावी आणि आपल्या सहकाऱ्यांनाही त्यावर अंमल करण्यासाठी प्रवृत्त करावे एवढेच.

Exit mobile version