अखंड भारत व्यासपीठ व इतिहास संकलन समिती कोंकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार ३० जुलै रोजी जोगेश्वरी येथे अस्मिता विद्यालयात अभ्यास वर्गाचे आयोजन केले गेले होते.
अखंड भारत व्यासपीठाची नवीन कार्यकारणी याप्रसंगी घोषित झाली आहे. सुप्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते संजय ढवळीकर हे आता अखंड भारत व्यासपीठाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले आहे. माजी अध्यक्ष संतोष आदक यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवृत्ती घेतली आहे. अखंड भारत व्यासपीठाचे कार्याध्यक्ष म्हणून सुनील ढेंगळे तसेच कार्यवाह म्हणून अभय जगताप व संघटक पदावर मोहन अत्रे यांची नियुक्ती झाली आहे. अशा प्रकारचे अभ्यास वर्ग सातत्याने व्हावे अशी मागणी अनेक उपस्थितांनी यावेळी केली.
यंदाचा अभ्यास वर्ग हिंदवी स्वराज्य स्फूर्ती ते अखंड भारत पूर्ती या विषयावर आयोजित केला गेला होता. मुंबईत अतिवृष्टी होत असूनही या वर्गाला मुंबई व ठाणे परिसरातील ६६ जण उपस्थित होते. यामध्ये बहुतांश महाविद्यालयीन विद्यार्थी व तरुण उपस्थित होते. विख्यात इतिहासकार व शिवव्याख्याते पांडुरंगजी बलकवडे व मोहन शेटे हे उपस्थित होते. या व्यतिरिक्त मुस्लिम राष्ट्रीय विचार मंचाचे राष्ट्रीय संयोजक विराज पाचपोर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोंकण प्रांत संघचालक माननीय सतीश मोड हेही उपस्थित होते. नोंदणी झालेल्या ६६ जणांव्यतिरिक्त अन्य स्थानिक ४५ नागरिक उपस्थित होते.
हे ही वाचा:
दिल्ली-पुणे विस्तारा विमानात बॉम्ब असल्याचा बनावट फोन
फुटिरतावादी यासिन मलिकची पत्नी पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारमध्ये
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी भारतात नव्हे अफगाणिस्तानात; नऊ पत्रकारांना अटक
भारताची चीनवर मात; चंद्राभोवती भारताची तीन सक्रिय अंतराळयाने
‘हिंदवी स्वराज्य’ या शब्दाची व्यापकता किती आहे हे पांडुरंग बलकवडे यांनी पहिल्या सत्रात उलगडून दाखविले. स्वतः प्रांत संघचालक सतीश मोड यांच्या शब्दात सांगायचे तर ‘आज तक हिंदुत्व के परिप्रेक्ष्य में मैने पहली बार छत्रपती शिवाजी महाराज के चरित्र को इतने गहराईसे जाना’ अशी मनोभावना प्रगट केली. अशाच प्रकारची भावना या अभ्यास वर्गाला आवर्जून उपस्थित रहाणारे डॉ. अशोकराव मोडक यांनीही व्यक्त केली.
पांडुरंगजींनीच दुसऱ्या सत्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हिंदवी साम्राज्याचा विस्तार होतांना छत्रपती शिवाजी महाराजांनी पेरलेल्या हिंदवी विचारांचा राष्ट्रीय दृष्टिकोन संपूर्ण देशभर कसा विस्तारला याची असंख्य उदाहरण देत मांडणी केली. शत्रूचे सैन्य कितीही पट मोठे असो परंतु ध्येय वादाने जगणारे सैन्य असले की विजय आपलाच होतो हे पांडुरंग बलकवडे यांनी आवर्जून प्रतिपादिले. जवळजवळ दोन तास हे सत्र चालले. हिंदवी स्वराज्याचा सुवर्ण तेजाने झळाळणारा हा २०० वर्षांचा कालपट त्यांनी चित्रपट पहावा इतक्या अनोख्या पध्दतीने सांगितला.
दुसरे वक्ते मा. मोहन शेटे यांनी भारतीय स्वातंत्र्य युद्धाचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज या विषयाची मांडणी अत्यंत ओघवत्या पद्धतीने केली. १८५७ ते १९४७ या काळातील अनेक स्वातंत्र्ययोद्ध्यांचे छत्रपती शिवाजी महाराज कसे प्रेरणास्थान होते हे त्यांनी सोदाहरण समजावून सांगितले. मुस्लिम राष्ट्रीय विचार मंचाच्या राष्ट्रीय संयोजकांनी आजच्या काळात भारतीय उपखंडामधील समाज मानस विशेषत: भारतातील मुस्लिम समाजाची मानसिकता उपस्थितांसमोर उलगडून सांगितली. मोदी राजवट येण्याअगोदर २०१३ साली ३७० कलम हटवण्यासाठी साडेपाच लाख मुस्लिम बांधवांनी सह्यांचे निवेदन कसे दिले होते, तसेच आता पर्यंत यूसीसी आणण्या साठी साडेतीन लाख मुस्लिम बांधवांनी मागणी केली आहे व त्यासाठी मुस्लीम समाजांतर्गत कसा प्रयत्न केला जात आहे याचीही माहिती दिली.
या अभ्यास वर्गात हेमाद्री या मोडी लिपीतील नवव्या हस्तलिखित अंकाचे माननीय बलकवडे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या अभ्यास वर्गाचे सुरेख सूत्रसंचालन ठाणे येथील मनोरमा नगर मध्ये चाणक्य अभ्यासिका प्रमुख असलेल्या रोशनी घरत हिने केले व आभार प्रदर्शन कुमारी रश्मी पांचाळ यांनी केले. संस्कार भारतीचे प्रांत कार्यकर्ते शेखर अभ्यंकर यांच्या संपूर्ण वंदे मातरमने वर्गाचा समारोप झाला.