भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाने निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेदरम्यानच सानिया मिर्झाने ही घोषणा केली. २०२२ हा शेवटचा हंगाम असेल, असं म्हणत सानियाने खेळातून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं आहे.
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सहभागी झालेल्या सानिया मिर्झाला बुधवारी पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर सानियाने थेट आपल्या निवृत्तीची घोषणा केली. पराभवानंतर बोलताना सानिया मिर्झा म्हणाली, ” हा माझा अखेरचा हंगाम असेल, मी प्रत्येक आठवड्याला पुढची तयारी करत आहे. पूर्ण हंगाम खेळू शकेल हे निश्चितपणे सांगता येणार नाही. मी चांगला खेळ करू शकते, असं मला वाटतं; पण आता शरीर पूर्वीसारखं साथ देत नाही.”असं सानिया मिर्झाने निवृत्तीची घोषणा करताना म्हटलं आहे.
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार युक्रेनची नादिया किचनोक यांना पहिल्या फेरीतच पराभवाला सामोरं जावं लागलं. स्लोव्हेनियाच्या तमारा झिदानसेक आणि काजा जुवान या जोडीने त्यांचा पराभव केला. दरम्यान सानिया मिर्झा आता या स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत अमेरिकेच्या राजीव रामसह सहभागी होणार आहे.
हे ही वाचा:
नगरपंचायत निवडणुकांत भाजपा महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर
संन्यासी योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या आईने का सोपविले राष्ट्रसेवेसाठी?
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचा कार्यकाळ तीन वर्षांसाठी वाढणार
अबुधाबी ड्रोनहल्ल्याचा अरब सैन्याने घेतला असा बदला!
सानिया मिर्झा २००३ पासून आंतरराष्ट्रीय टेनिस सामने खेळत असून, तब्बल दोन दशकानंतर टेनिसमधून संन्यास घेणार आहे. ३५ वर्षीय सानिया मिर्झा भारताची लोकप्रिय टेनिस खेळाडू राहिली आहे. सानिया मिर्झाने आतापर्यंतच्या कारकीर्दीत अनेक किताब मिळवले आहेत. सानिया मिर्झाने आपल्या कामगिरीतून उदयोन्मुख खेळाडूंनाही प्रेरणा दिली.
सानिया मिर्झाने दुहेरीत ऑस्ट्रेलियन ओपन, विम्बल्डन, अमेरिकी ओपन स्पर्धेचं विजेतपद पटकावलं आहे. त्याचबरोबर मिश्र दुहेरीतही ऑस्ट्रेलियन ओपन आणि अमेरिकन ओपन स्पर्धेत किताब मिळवला आहे. आपल्या खेळाबरोबरच सानिया मिर्झा इतर गोष्टींमुळे चर्चेत राहिली. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत लग्न करण्याच्या निर्णयामुळे सानियाला टीकेचा सामना करावा लागला होता. त्याचबरोबर सुरूवातीच्या काळात राष्ट्रगीतावरून झालेल्या वादामुळे सानियावर टीका झाली होती.