सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून महाविकास आघाडीत अजूनही तेढ असल्याचं पाहायला मिळत आहे.सांगलीमध्ये काँग्रेसची ताकद जास्त असूनही शिवसेना ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर केला.ठाकरे गटाच्या वृत्तीने आणि संजय राऊत यांच्या वक्तव्याने काँग्रेसचे नेते आणिं सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असणारे विशाल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.विशाल पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आपली खंत व्यक्त केली आणि सांगलीची जागा लढण्यावर ठाम असल्याचं सांगितले.
विशाल पाटील म्हणाले की, विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस एकसंघ काम करत आहे. कॉंग्रेस पक्षच सांगली लोकसभेची जागा लढवेल असा निर्णय घेतला होता. सर्वांचे एकमत झाल्यानंतर सांगलीतून उमेदवारीसाठी माझे नाव दिल्लीला पाठवण्यात आलं.पण हा जागा वाटपाचा तिढा अनपेक्षितपणे पुढे आला, असे विशाल पाटील म्हणाले.
आमच्याकडून कोणतेही आक्रमक वक्तव्य केली गेली नाहीत.आम्ही भाजपविरोधी आहोत, अन संजय राऊत माध्यमासमोर येऊन भाजप विरोधात बोलत आहेत.वसंतदादा यांनी त्याकाळी शिवसेनेला मदत केली होती. या ठिकाणाहून लढण्यासाठी आता आम्ही इच्छूक आहोत.सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवारच लढेल.सर्वांना माहिती आहे, अन सांगलीच्या घराघरात काँग्रेस आहे, असे विशाल पाटील म्हणाले.
हे ही वाचा..
बीआरएस नेत्या के.कवितांना कोर्टातून मोठा झटका!
काय सांगता! चक्क उंदरांनी १९ किलो गांजा आणि भांग खाल्ला!
गडचिरोली पोलीस दलाची कारवाई; दोन जहाल महिला माओवाद्यांना अटक
‘मी गोमांस खात नाही…गर्व आहे मला हिंदू असल्याचा’!
ते पुढे म्हणाले की, संजय राऊतांना सांगलीकरांनी आवाज दिला. पण तोच आवाज सांगलीकरांच्या विरोधात सांगलीत वापरला गेला. त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या मनात थोडी खंत जाणवते आहे. इथे दुसरा कोणता विषय चर्चेचा नाही. त्यांनी विश्वजीत कदम यांच्याबाबत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे काही विधानं केली. विश्वजीत कदम सांगलीच्या प्रत्येक व्यक्तीचं म्हणणं मांडत होते. अशावेळी त्यांच्याविषयी संशय घेऊन काहीतरी भूमिका मांडणं हे युती धर्माला शोभेसं नाही. विश्वजीत कदम कुठल्यातरी पक्षात जाणार आहेत असं कुणीतरी बोलणं चुकीचं आहे. ते आमच्या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत”, असे विशाल पाटील म्हणाले अन संजय राऊत यांच्यावर नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, मंगळवारी महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत आघाडीचं अंतिम जागावाटप जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.सांगलीच्या जागेचा तिढा सुटेल की नाही हे या संयुक्त पत्रकार परिषदेतून समोर येईल.