मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत आता माजी क्रिकेटपटू संदीप पाटील आणि माजी उपाध्यक्ष अमोल काळे यांच्यात अध्यक्षपदासाठी झुंज होणार आहे. मात्र ही झुंज अटीतटीची असेल. कारण संदीप पाटील हे मुंबई क्रिकेट ग्रुप या पॅनलमधून निवडणूक लढवत आहेत तर अमोल काळे शरद पवार-आशीष शेलार पॅनलमधून. काळे हे याआधी उपाध्यक्ष राहिलेले आहेत तर संदीप पाटील हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मातब्बर खेळाडू आहेत. त्यामुळे त्यात बाजी कोण मारतो याची उत्सुकता असेल. २० ऑक्टोबरला ही निवडणूक होत आहे. आशीष शेलारही अध्यक्षपदासाठी इच्छुक होते पण त्यांना बीसीसीआय खजिनदारपदाची संधी मिळाल्यानंतर त्यांनी मुंबई क्रिकेटचा मार्ग बदलला.
सचिवपदासाठी तर तीन उमेदवार आहेत. अजिंक्य नाईक हे मुंबई क्रिकेट ग्रुप आणि शरद पवार-आशीष शेलार गटाचेही उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांना निवडणूक जिंकणे सोपे जाईल असे बोलले जात आहे. मात्र त्यात नील सावंत हे याआधी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेल्या रवी सावंत यांचे सुपुत्रही बाळ महाडदळकर गटातून सचिवपदासाठी मैदानात उतरले आहेत. तर स्वतंत्रपणे मयांक खांडवाला यांनीही जोर लावला आहे.
हे ही वाचा:
गोठवलेल्या पराठ्यांवर जीएसटी लावल्याने अरविंद केजरीवाल करपले
ज्ञानवापी शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगची मागणी फेटाळली
भुजबळ मुख्यमंत्री झाले असते मग शिंदे का नाही
पाकिस्तानी ड्रोनची घुसखोरी हाणून पाडली
खजिनदारपदासाठीही तीन उमेदवार असल्यामुळे चुरस असेल. मागील कार्यकारिणीत खजिनदार असलेले जगदीश आचरेकर हे मुंबई क्रिकेट ग्रुपचे उमेदवार आहेत तर संजीव खानोलकर हे बाळ महाडदळकर ग्रुपचे उमेदवार आहेत. तिसरे उमेदवार असतील अरमान मलिक.
अपेक्स कौन्सिल सदस्यांसाठी २३ उमेदवार आहेत. त्यात मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड यांचा समावेश आहे. हे पवार-शेलार पॅनलचे उमेदवार आहेत.