तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि राज्याचे युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री उदयनिधी यांनी सनातन धर्माचा संबंध ‘मलेरिया’ आणि ‘डेंग्यू’ यांच्याशी जोडल्याने वाद निर्माण झाला आहे.
उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवारी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी केल्याने आणि त्याला नुसता विरोध करू नये, तर त्याचे निर्मूलन केले पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. ते ‘सनातन निर्मूलन परिषदे’त बोलत होते. ‘सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करता येत नाही, त्या केवळ नामशेषच केल्या जातात. डेंग्यू, डास, मलेरिया किंवा करोनाला आपण विरोध करू शकत नाही. त्यांना समूळ नष्ट करायचे असते. त्याचप्रमाणे सनातनचा नायनाट करण्यासाठी त्याला विरोध करण्यापेक्षा ते समूळ नष्ट केले पाहिजे,’ असे वक्तव्य त्यांनी केले.
‘सनातन हे नाव संस्कृतमधून आले आहे. हे सामाजिक न्याय आणि समानतेच्या विरोधात आहे,’ असे उदयनिधी स्टॅलिन म्हणाले.
भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्मावर केलेल्या टिप्पणीबद्दल त्यांना फटकारले. ‘उदयनिधी हे ८० टक्के लोकांच्या नरसंहाराचे आवाहन करत आहेत,’ अशी टीका मालवीय यांनी केली. ‘द्रमुक सरकारने सनातन धर्माचा संबंध मलेरिया आणि डेंग्यूशी जोडला आहे. केवळ विरोध न करता ते नष्ट केले पाहिजे, असे त्यांचे मत आहे. थोडक्यात, सनातन धर्माचे पालन करणार्या भारतातील ८० टक्के लोकसंख्येच्या नरसंहाराचे ते आवाहन करत आहेत. द्रमुक हा विरोधी गटाचा प्रमुख सदस्य आणि काँग्रेसचा दीर्घकाळ मित्रपक्ष आहे. मुंबईच्या बैठकीत हेच मान्य झाले आहे का?’ असा प्रश्न अमित मालवीय यांनी उपस्थित केला आहे.
हे ही वाचा:
आदित्य एल 1 च्या यशस्वी प्रक्षेपण; पंतप्रधान मोदींकडून इस्रोचे अभिनंदन
जालना आंदोलनातून महाराष्ट्र अस्वस्थ करण्याचा प्रयत्न
ओ मोठ्ठ्या ताई, महाराष्ट्र पेटवू नका! मराठा समाजाला तुम्ही आरक्षण का दिले नाही?
ऑगस्टमध्ये जीएसटी जमा होण्याचा नवा विक्रम
मालवीय यांच्या टीकेनंतर उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माचे अनुयायी असलेल्या लोकांचा ‘नरसंहार’ करण्याचे आवाहन आपण केलेले नाही, असे स्पष्ट केले आहे. मात्र ते त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. ‘मी माझ्या शब्दांवर ठाम आहे आणि सनातन धर्मामुळे दु:ख पदरी पडलेल्या उपेक्षित समुदायांच्या बाजूने मी बोललो आहे. माझ्या वक्तव्यासंदर्भात कोणत्याही कायदेशीर आव्हानांना तोंड देण्यासाठी मी तयार आहे. एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली द्रमुक सरकार सामाजिक न्याय टिकवून ठेवण्यासाठी आणि समतावादी समाजाची स्थापना करण्यासाठी सदैव लढा देईल,’ असे उदयनिधी यांनी स्पष्ट केले आहे. ‘आम्ही, पेरियार, अण्णा आणि कलैग्नार यांचे अनुयायी आहोत. आम्ही मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय टिकवून ठेवण्यासाठी आणि समतावादी समाजाची स्थापना करण्यासाठी सदैव लढा देऊ. मी आज, उद्या आणि सदैव सांगेन – द्रविड भूमीतून सनातन धर्माचे उच्चाटन करण्याचा आमचा संकल्प थोडाही कमी होणार नाही,’ असे ते म्हणाले.