समीर वानखेडे यांचा एनसीबी कार्यकाळ संपला; कशी होती त्यांची कारकीर्द?

समीर वानखेडे यांचा एनसीबी कार्यकाळ संपला; कशी होती त्यांची कारकीर्द?

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) मुंबई विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांचा कार्यकाळ शुक्रवारी ३१ डिसेंबर रोजी संपणार आहे. समीर वानखेडे हे २००८च्या बॅचचे भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी होते. समीर वानखेडे हे पूर्वीपासून प्रकाशझोतात होते. मात्र, सुशांत सिंग राजपूत आणि आर्यन खान प्रकरणांमुळे ते चर्चेत आले. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला समीर वानखेडे यांनी सांगितले होते की, ते एनसीबीकडे मुदतवाढ मागणार नाहीत. एनसीबीमधील त्यांच्या कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची नेमणूक कोठे केली जाईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे वृत्त आहे.

समीर वानखेडे यांची एनसीबीमधील कारकीर्द उल्लेखनीय राहिली नसून अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील अनेक मोठ्या व्यक्तिमत्त्वांची ड्रग्ज प्रकरणात चौकशी केली होती. यावर्षी ऑक्टोबरमध्ये समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मुंबई किनार्‍यावरील क्रूझवर छापा टाकला होता. या कारवाईमध्ये वानखेडे यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि त्याच्या इतर साथीदारांना अटक केली होती. त्यानंतर मात्र, या छाप्यादरम्यान वापरलेल्या स्वतंत्र साक्षीदारांच्या ओळखपत्रांवर प्रश्न उपस्थित केले गेले. तसेच अमली पदार्थ विरोधी एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी शाहरुख खानकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला होता.

हे ही वाचा:

चीन म्हणतोय, भारतातील ही १५ ठिकाणे चीनचा भाग आहेत

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपचे वर्चस्व

श्रीनगरमधील चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार

मुंबई हाय अलर्टवर, पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले होते. समीर वानखेडे हे जन्मतः मुस्लिम होते, परंतु नंतर अनुसूचित जाती (एससी) कोट्यातील नोकरी मिळविण्यासाठी त्यांनी खोटे जात प्रमाणपत्र तयार केल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले होते. या आरोपांमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती.

ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत समीर वानखेडे यांनी ९६ जणांना अटक केली होती तर २८ गुन्हे दाखल केले. २०२१ मध्ये समीर वानखेडे यांनी २३४ जणांना अटक केली होती. सुमारे एक हजार कोटी रुपयांचे १ हजार ७९१ किलो पेक्षा जास्त ड्रग्ज जप्त केले होते.

Exit mobile version