गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या संभल हिंसाचार प्रकरणात एसआयटीने मोठी कारवाई केली आहे. रविवारी (२३ मार्च) चौकशीनंतर एसआयटीने जामा मशिदीचे प्रमुख जफर अलीला अटक केली आहे. जफर अलीला यापूर्वी अनेक वेळा नोटीस बजावून समन्स बजावण्यात आले होते, परंतु जफर अली हजर झाला नाही. या प्रकरणी आज एसआयटी पथक संभलमध्ये दाखल होत जफर अलीला ताब्यात घेवून त्याची पोलीस ठाण्यात चौकशी केली. चौकशीनंतर पथकाने त्याला अटक केली.
२४ नोव्हेंबर रोजी झालेल्या हिंसाचाराच्या आरोपाखाली जफरला अटक करण्यात आली आहे. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला होता. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, पोलिस ठाण्यात पीएसी आणि आरआरएफसह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, शाही जामा मशिदीचे प्रमुख जफर अलीच्या अटकेनंतर, संभलचे सीओ अनुज चौधरी म्हणाले की, शांतता राखण्यासाठी आधीच पुरेसे बळ तैनात करण्यात आले आहे आणि परिसरात अजूनही पुरेसे बळ आहे. चौकशीनंतर एसआयटीने जफर अलीला अटक केली, ज्याचा वकिलांनी निषेध करत ही चुकीची अटक असल्याचा आरोप केला. त्याला वैद्यकीय तपासणी आणि जामीन प्रक्रियेसाठी चंदौसी येथे नेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा :
‘कीड़ा जडी’ – अनेक रोगांवर प्रभावी, किंमत ऐकून व्हाल थक्क!
सूखा किंवा कफयुक्त खोकल्यावर रामबाण उपाय
धोनीवर प्रश्न उपस्थित केले, बॅटने उत्तर देत गप्प केले – गावस्कर
गेल्या वर्षी २४ नोव्हेंबर रोजी संभलमध्ये जामा मशिदीच्या सर्वेक्षणाबाबत हिंसाचार झाला होता. हिंदू पक्षाचा दावा आहे की ते पूर्वीचे हरिहर मंदिर होते जे १५२९ मध्ये बाबरने पाडले आणि मशिदीत रूपांतरित केले. याबाबत १९ नोव्हेंबर २०२४ रोजी संभल न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्याच दिवशी, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग आदित्य सिंह यांनी मशिदीच्या आत सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. यानंतर, जेव्हा मशिदीच्या आत सर्वेक्षण केले जात होते. त्यावेळी बाहेर हिंसाचार सुरू झाला. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. संभल हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी ५० हून अधिक लोकांना तुरुंगात पाठवले आहे, ज्यात अनेक महिलांचा समावेश आहे.