महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका आणि थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी. त्यांचे महाराष्ट्रातील समाजाप्रती आणि शिक्षणाप्रतीचे योगदान फार मोठे आहे. १९ व्या शतकांत जिथे स्त्रिया आणि मुलींचे शिक्षण हे स्वप्न असायचे तेव्हा एका स्त्रीने केवळ अभ्यासच केला नाही तर, आपल्या मुलींना शिक्षण देण्यासाठी पुढाकार सुद्धा घेतला. महिलांचा छळ, जातीयवाद अशी अनेक दुष्कृत्ये महाराष्ट्रात चालू होती. त्या परिस्थितीत सावित्रीबाई फुले यांनी आपल्या पतीला केवळ आधारच न देता, सावित्रीबाई स्वतः शिक्षिका बनून मुलींच्या शिक्षणामध्ये त्यांनी सहभाग घेतला. भारतातील समाजसुधारक आणि स्त्रियांच्या हक्कासाठी लढणाऱ्या यामध्ये जात आणि लिंगाच्या आधारावर भेदभाव नष्ट करणे हे त्यांनी समाविष्ट केले होते.
सावित्रीबाईंचा जन्म तीन जानेवारी १८३१ ला सातारा जिल्ह्यात नायगाव इथे माळी समाजात झाला. वयाच्या नवव्या वर्षी सावित्रीबाईंचा विवाह १३ वर्षीय ज्योतिबा फुले यांच्याबरोबर झाला. फुले दांपंत्याला स्वतःचे मूल नव्हते तेव्हा त्यांनी एका ब्राह्मण विधवा बाईंचा मुलगा यशवंतराव दत्तक घेतला होता. विधवा आईमुळे यशवंतराव याच्याबरोबर कोणी विवाह करण्यास तयार नव्हते म्हणून सावित्रीबाईंनी त्यांच्या संस्थेतील दैनोबा ससाणे यांच्या मुलीशी त्याचा विवाह लावून दिला. ज्योतिबा फुले यांनी पहिल्यांदा सावित्रीबाईंचे शिक्षण घरीच सुरु केले. सावित्रीबाईंनी अहमदनगरच्या अमेरिकेन मिशनरी सिंथिया आणि नंतर पुण्याच्या शाळेतून शिक्षिकेचे प्रशिक्षण घेतले.
वयाच्या फक्त १७ व्या वर्षी त्या पहिल्या महिला शिक्षिका झाल्या नाहीत तर, त्या पहिल्या महिला मुख्याध्यापकही बनल्या होत्या. १८४८ साली सावित्रीबाईंनी ज्योतिबा फुल्यांच्या मदतीने पुण्यातल्या भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. त्यांच्या शाळेची खास बाब म्हणजे आधुनिक शिक्षणावर जास्त भर देऊन त्याच शाळेत गणित, सामाजिक शास्त्र आणि विज्ञान यावर भर देण्यात येत होता. त्याकाळांत इतर शाळांपेक्षा या शाळेच्या शिक्षणाचा दर्जा खूप चांगला होता. मुख्यतः सरकारी शाळेतील विद्यार्थिनींची संख्या ही फुले दाम्पत्याच्या शाळेच्या संख्येपेक्षा अत्यंत कमी होती , पण सावित्रीबाईंनी या शाळेसाठी समाजातील कठोर अपमान, अवहेलना , दुःखे सहन केली आहेत. परंपरावादी स्थानिक लोकांनी त्यांच्या कार्याला भरपूर विरोध केला.
हे ही वाचा:
समृद्धी महामार्गावरून शक्तिपीठ महामार्गाकडे
किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर पुन्हा उद्धव ठाकरेंचे ‘पार्टनर’
सावित्रीबाई शाळेत गेल्यावर लोक त्यांच्यावर शेण, चिखल , दगड अंगावर फेकत होते. वाईट शब्दही त्यांना ऐकायला लागले. म्हणून सावित्रीबाई नेहमी स्वतःबरोबर आणखी एक जोड कपडे तयार ठेवत असत. समाजाच्या विरोधामुळे फुले दाम्पत्याला आपले राहते वडिलांचे घर सोडावे लागले होते. ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांनी १८५१ पर्यंत पुण्यांत तीन शाळा उघडल्या ज्यामध्ये एकूण १५० विद्यार्थिनी होत्या. यांच्या शाळांचा अभ्यासक्रम हा सरकारी शाळांपेक्षा वेगळा होता. त्यानंतर त्यांनी आपल्या शाळांची संख्या वाढवून अठरा पर्यंत नेली होती. आज सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांना आणि त्यांच्या कार्याला शतशः नमन.