बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या मुंबईतील वांद्रे याठिकाणी असणाऱ्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात गोळीबार करण्यात आला होता. यातून बिश्नोई टोळीचे नाव समोर आले होते. यानंतरही सलमान खानला सातत्याने जीवे मारण्याच्या धमकी मिळत होत्या. त्याच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली होती.
दरम्यान, अभिनेता सलमान खानने त्याच्या मुंबईतील निवासस्थान गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सुरक्षा वाढवली आहे. त्याच्या घराला बुलेटप्रूफ काच आणि इलेक्ट्रिक कुंपण घालण्यात आले आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर नूतनीकरणाचे काम सुरू होते. आता ते काम पूर्ण झाल्याचे दिसत आहे. अभिनेत्याच्या बाल्कनीत बुलेटप्रूफ काच लावण्यात आली असून घराची बाल्कनी झाकण्यात आली आहे. सलमान खानला मिळालेल्या धमक्यांनंतर आणि त्याच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर त्याला राज्य सरकारकडून Y+ सुरक्षा मिळाली होती. शिवाय मधल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सलमान खान याचे जवळचे मानले जाणारे बाबा सिद्दीकी यांची हत्या मुंबईत झाली. त्यांच्या हत्येनंतर सलमान खानच्याही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
हे ही वाचा..
पत्रकार हत्या: मुख्य आरोपी सुरेश चंद्राकरचे काँग्रेसशी असलेले संबंध लपविण्याचा प्रयत्न
दिल्ली विधानसभा निवडणूक: ५ फेब्रुवारीला मतदान; ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी
अबब ! नितीन गडकरींनी करून दिला १२०० कोटींचा नफा!
गुजरातमध्ये ‘आप’ नेता बनला अन्नामलाई, स्वतःला मारले पट्ट्याचे फटके
अभिनेता सलमान खान हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर असून अनेक वेळा सलमान खान आणि त्याचे वडील सलिम खान यांना लॉरेन्स बिश्नोई कडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. १४ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांनी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला होता. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. या घटनेची जबाबदारी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल बिष्णोई याने घेतली होती.