सलमान खान गोळीबार प्रकरण; हल्लेखोरांच्या पोलीस कोठडीत वाढ, आणखी दोघांना अटक

सलमान खान गोळीबार प्रकरण; हल्लेखोरांच्या पोलीस कोठडीत वाढ, आणखी दोघांना अटक

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्र्यातील ‘गॅलक्सी अपार्टमेंट’वर गोळीबार करून सलमान खानच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या अटक आरोपीच्या पोलीस कोठडीत २९ एप्रिल पर्यत वाढ करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने आरोपीनी गुन्ह्यात वापरलेले दोन पिस्तुल, ४ मॅगझीन आणि १७ काडतुसे सुरत येथील तापी नदीच्या पात्रातून हस्तगत केली आहे. या हल्ल्यासाठी आरोपींकडे ४० काडतुसे होती, तसेच हे हल्लेखोरानी सलमान खानला जीवे मारण्यासाठी अनेक वेळा गॅलक्सी आपर्टमेंटची रेकी केली होती असे तपासात निष्पन्न झाल्याचे गुन्हे शाखेने न्यायालयात माहिती दिली आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या निशाण्यावर असून अनेक वेळा सलमान खान आणि त्यांचे वडील सलिम खान यांना लॉरेन्स बिष्णोई कडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. १४ एप्रिल रोजी पहाटे लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या दोन सदस्यांनी सलमान खानच्या वांद्र्यातील ‘गॅलक्सी अपार्टमेंट’वर गोळीबार करून सलमान खानला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्याची जवाबदारी तिहार तुरुंगात असलेला लॉरेन्स बिष्णोई चा परदेशात असलेल्या भाऊ अभिनव बिष्णोई याने फेसबुकवर पोस्ट करून स्वीकारली होती.

या गुन्ह्याचा तपास मुंबई गुन्हे शाखा कक्ष ९ कडे देण्यात आल्यानंतर गुन्हे शाखेने गोळीबार करून पळून गेलेल्या दोन हल्लेखोरांना गेल्या आठवड्यात गुजरात राज्यातील कच्छ भुज येथील एका मंदिरातून अटक केली होती. विकी कुमार गुप्ता आणि सागर कुमार पाल असे अटक करण्यात आलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत. मूळचे बिहार राज्यातील चंपारण येथे रहिवासी असणारे हल्लेखोर हे लॉरेन्स बिष्णोई टोळीचे सदस्य असून पोलीस कोठडीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे. दरम्यान गुन्हे शाखेने हल्ल्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल वांद्रे माउंटमेरी येथून हस्तगत केली आहे, तसेच हल्ल्यासाठी वापरलेले पिस्तुल आणि काडतुसे तापी नदीत फेकल्याची कबुली दोघांनी दिली होती. गुन्हे शाखेने सोमवारी सुरत येथील तापी नदीच्या पात्रातून दोन पिस्तुल, ४मॅगझीन आणि १७ काडतुसे जप्त केली आहे.

हे ही वाचा:

उबाठा म्हणजे रंग बदलणारा ‘सरडा’

मतदानावेळी महिलांचे मोदी प्रेम; ईव्हीएमवर मोदींचा फोटो नाही तर मतदान करणार नाही

पाटणा रेल्वे स्थानकाजवळील हॉटेलला आग, ६ जणांचा मृत्यू!

सलमान खान गोळीबार प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून आरोपींची तीन तास चौकशी

सलमान खानच्या हल्ल्यासाठी हल्लेखोराकडे ४० काडतुसे होती त्यापैकी १७ हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे. या गुन्ह्यात गुन्हे शाखेने ९ जणांची साक्ष नोंदवली असून दोन जणांची साक्ष न्यायालयासमोर घेण्यात आली आहे. गुरुवारी आरोपींची पोलीस कोठडी संपली असता त्यांना गुरुवारी पुन्हा किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते, हल्लेखोरांचे सबंध आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीशी असून हल्लेखोर सलमान खान सह मुंबईत आणखी काही सेलेब्रिटी वर हल्ला करणार होते अशी माहिती गुन्हे शाखेने दिली आहे.

तसेच गुन्ह्यातील आणखी शस्त्र जप्त करायची असून तसेच हल्लेखोर बिहार राज्यातील असून त्यांनी हरियाणा, पंजाब, राजस्थान इत राज्यात देखील भेट दिलेली असून त्या ठिकाणी या दोघांनी कोणाची भेट घेतली याचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेने ४ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी न्यायालयात केली. दरम्यान आरोपीचे वकील अजय उमापती दुबे यांनी गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीच्या मागणीला विरोध करून न्यायालय कोठडीची मागणी केली.न्यायालयाने दोन्ही बाजू एकूण गुन्ह्याची गंभीरता आणि विस्तार बघून आरोपीना २९ एप्रिल पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हल्लेखोरांना शस्त्र पुरविणारे दोघे अटकेत

सलमान खान निवासस्थान गोळीबार प्रकरणात आणखी दोघांना पंजाबमधून मुंबई गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून त्यांना मुंबईत आणण्यात येत आहे. अनुज आणि सोनू चंदर असे ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे असून या दोघांनी हल्लेखोरांना शस्त्र पुरवली होती अशी माहिती सहपोलिस आयुक्त लखमी गौतम यांनी दिली. अनुज आणि सोनू हे दोघे हल्ल्याच्या काही आठवड्यापूर्वी पनवेल येथे गेले होते व या दोघांनी पिस्तुल आणि ४० काडतुसे हल्लेखोर विकी गुप्ता आणि सागर पाल यांना दिली होती. तीन तास पनवेल मध्ये राहिल्यानंतर अनुज आणि सोनू हे दोघे पंजाबला रवाना झाले. अनुज हा लॉरेन्स बिष्णोई गॅंगचा सदस्य असून त्याच्या वर ३ गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.

Exit mobile version