कुस्ती फेडरेशनच्या निवडणुकीनंतर साक्षी मलिक, विनेश फोगटचा कुस्तीला रामराम!

संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड

कुस्ती फेडरेशनच्या निवडणुकीनंतर साक्षी मलिक, विनेश फोगटचा कुस्तीला रामराम!

रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या (WFI) निवडणुक निकालानंतर महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने महत्त्वाची घोषणा केली आहे. कुस्तीमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा साक्षी हिने केली आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांचे निकटवर्ती संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर साक्षी हिने हा निर्णय घेतला आहे. तिच्यासोबतच विनेश फोगट यांनीही कुस्तीला रामराम ठोकला आहे.

भारतीय कुस्ती महासंघाने नवीन अध्यक्षाची घोषणा केल्यानंतर साक्षी मलिकने पत्रकार परिषद घेऊन तिच्या निर्णयाची घोषणा केली. तिने रडत सांगितले की, “आम्ही ४० दिवस रस्त्यावर झोपलो. देशाच्या अनेक भागातून अनेक लोक आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आले. वृद्ध महिला आल्या. असे लोकही आले ज्यांच्याकडे पैसा नव्हता. आम्ही जिंकलो नाही, पण तुम्हा सर्वांचे आभार. आम्ही मनापासून लढलो, पण ब्रिजभूषण शरण सिंह यांचे जवळचे सहकारी निवडून आले आहेत तर मी माझी कुस्ती सोडते,” असे म्हणत साक्षीने तिचे शूज उचलले आणि टेबलावर ठेवले.

दरम्यान, कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाला की, “क्रीडामंत्र्यांनी रेकॉर्डवर सांगितले होते की ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याशी संबंधित कोणीही महासंघात येणार नाही, पण मुलींना न्याय मिळेल असे मला वाटत नाही. आजच्या निवडणुकीत ब्रिजभूषण यांचा माणूस विजयी झाला आहे. ते म्हणाले की न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे की ते न्याय देतील. न्यायासाठी पिढ्यानपिढ्या लढत राहतील, असे दिसते,” असेही तो म्हणाला.

साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केल्यानंतर विनेश फोगट भावूक झाली. ती म्हणाले की हे खरोखर दुःखदायक आहे. आम्ही लढण्याचा प्रयत्न केला, पण जिंकू शकलो नाही. न्याय कसा मिळेल माहीत नाही, न्यायासाठी आवाज उठवणाऱ्या प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केला. मी तरुण खेळाडूंना सांगू इच्छितो की, अन्यायाचा सामना करण्यासाठी तयार राहा. कुस्तीचे भवितव्य अंधारात आहे. अपेक्षा खूप कमी आहेत, पण आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे. त्यानंतर तिनेही कुस्ती खेळामधून राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले.

रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष, कोषाध्यक्ष, सरचिटणीस आणि वरिष्ठ उपाध्यक्ष अशा १५ पदांसाठी दिल्लीत निवडणूक झाली. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेती अनिता शेओरान आणि उत्तर प्रदेश कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष संजय सिंह यांच्यात लढत होती. मात्र, संजय सिंह यांचा वरचष्मा होता. संजय सिंह ब्रिजभूषण हे शरण सिंह यांचे निकटचे सहकारी आहेत, त्यांनी कुस्तीचे वैभवाचे दिवस परत आणण्याचे आश्वासन दिले आहे.

हे ही वाचा:

प्रशांत कारुळकर यांना मेजर जनरल विक्रांत नाईक यांच्याकडून सन्मानचिन्ह

शपथ पूर्ण झाली, ५०० वर्षांनंतर क्षत्रिय घालणार पगडी आणि चामड्याचे जोडे!

उत्तर प्रदेशमध्ये पक्षही उभा रहात नाही आणि निवडणूकही जिंकत नाही

संसद भवनाची सुरक्षा आता ‘सीआयएसएफ’ करणार

या वर्षी जानेवारीमध्ये काही महिला कुस्तीपटूंनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. या आरोपांनंतर विनेश फोगट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि संगीता फोगट यांच्यासह देशातील अव्वल कुस्तीपटूंनी त्यांना हटवण्याची मागणी करत निषेध करण्यास सुरुवात केली. या वादानंतर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) ने रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाची ती समिती विसर्जित करून एक समिती स्थापन केली आणि रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी सोपवली.

Exit mobile version