आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आमची सगळी पदके गंगेत सोडून देऊ असा इशारा सध्या कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करत असलेल्या कुस्तीगीरांनी दिला होता. त्याप्रमाणे सगळे खेळाडू हरिद्वारला पोहोचले. पण तो कार्यक्रम रद्द करण्यात आला.
नंतर तिथे शेतकरी नेते नरेश टिकैत पोहोचले. त्यांनी खेळाडूंकडून पदके गोळा केली आणि पाच दिवसांची मुदत दिली. त्यानंतर सगळे खेळाडू तिथून निघून गेले.
साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांनी म्हटले होते की, मंगळवारी ते आपली पदके गंगेत सोडून देतील. संध्याकाळी हरिद्वार येथे जाऊन ते आपली पदके गंगेत सोडणार आहेत, असे त्यांनी आपल्या ट्विटरवर म्हटले होते.
२३ एप्रिलपासून हे खेळाडू आंदोलन करत असून बृजभूषण सिंह यांच्यावर त्यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. २८ मे रोजी त्यांनी नव्या संसद भवनाकडे कूच केले होते. पण तेथे त्यांना पोलिसांनी अडवले. त्यांनी सुरक्षा व्यवस्था मोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना पोलिसांनी रोखले आणि गाडीत कोंबले. तेव्हा पोलिस आणि कुस्तीगीर यांच्यात जोरदार झटापट झाली. कुस्तीगीर खाली पडल्याचे फोटोही त्यावेळी व्हायरल झाले.
या सगळ्या खेळाडूंनी संयुक्त निवेदन तयार करून जे पंतप्रधान आम्हाला मुलगी मानतात त्यांनी एकदाही आमच्या या मुद्द्यांकडे लक्ष दिलेले नाही. उलट त्यांनी बृजभूषण सिंह यांनाच आमंत्रित केले.
हे ही वाचा:
लगोरी स्पर्धेच्या निमित्ताने शिक्षकाने मुलींचे केले होते लैंगिक शोषण, ठोठावली शिक्षा
कॉंग्रेसचे तरुण तडफदार खासदार बाळू धानोरकर यांचे निधन
भांडवलशाहीविरोधी कम्युनिस्ट नेत्याला ५० लाखांची मिनी कूपर पडली महागात
ब्राह्मोस क्षेपणास्त्र पाकिस्तानमध्ये चुकून डागल्याने भारताच्या तिजोरीला पडला खड्डा
नव्या संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी बृजभूषण तिथे उपस्थित होते.
साक्षी मलिकने आपल्या ट्विटर हँडलवर म्हटले आहे की, कुस्तीगीरांनी लैंगिक शोषणाविरोधात आंदोलन करून कुठला तरी गुन्हा केला आहे. पोलिस आमच्याशी अपराधी असल्याप्रमाणे वागत आहेत. पॉस्को कायदा बदलण्याची मागणीही केली जात आहे. आता या देशात आमचे काही उरलेले नाही, असे वाटते. जी पदके आम्ही जिंकली होती ती का जिंकली होती, असे आता आम्हाला वाटते आहे. आम्हाला कोणते स्थान आहे. केवळ सत्तेत येण्यासाठी आमचा उपयोग केला जातो आहे का? ही पदके आता आम्हाला नको आहेत. आता लोकांनी विचार करायचा आहे की, ते आमच्या सोबत आहेत की नाही की ते या शोषण करणाऱ्या प्रक्रियेच्या सोबत उभे आहेत.
साक्षीने म्हटले आहे की, आम्ही ही पदके गंगेत सोडणार आहोत. कारण गंगा हीच सर्वात पवित्र आहे. प्रचंड मेहनत घेऊन आम्ही ही पदके जिंकली आहेत. संपूर्ण देशासाठी ही पदके पवित्र आहेत. तेव्हा ती गंगेतच जाणे योग्य.