साक्षी मलिक ही काँग्रेसच्या हातातील बाहुले! कुस्तीगीरांमध्ये जुंपली

साक्षीने पतीसह भाजपावर शरसंधान केल्यानंतर त्याला बबिता फोगटचे प्रत्युत्तर

साक्षी मलिक ही काँग्रेसच्या हातातील बाहुले! कुस्तीगीरांमध्ये जुंपली

ऑलिम्पिक कांस्य विजेती कुस्तीगीर साक्षी मलिकने बृजभूषण सिंह यांच्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या निमित्ताने भाजपावर शरसंधान केले होते. त्यात भाजपाचे नेते तिरथ राणा आणि कुस्तीगीर तसेच भाजपा नेत्या बबिता फोगाट यांनीच जंतरमंतर येथील आंदोलनासाठी परवानगी घेतली होती मग आमच्या आंदोलनाला काँग्रेसची फूस आहे, असे कसे म्हणता येईल, असा आरोप साक्षीने केला होता. त्याला उत्तर देताना बबिता फोगटने म्हटले आहे की, साक्षी मलिक ही काँग्रेसच्या हातातील बाहुले आहे आणि तिने आपले आंदोलनामागील खरे उद्देश जनतेला सांगावेत.

बबिताने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या मित्राबाबत असे काही बोलू नका की नंतर ते तुम्हाला दडवावे लागेल. कारण याचा शिक्का हा कायम आपल्या कपाळावर राहतो.

बबिताने म्हटले आहे की, काल मी साक्षी मलिक आणि तिचे पती सत्यव्रत कादियन यांचा व्हीडिओ पाहिला आणि मला एकीकडे हसूही आले आणि दुःखही झाले. जंतरमंतरवर मी परवानगी घेऊन दिली होती असा जो दावा केला जात आहे, त्या पत्रावर माझी कुठेही स्वाक्षरी नाही किंवा माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. मी उलट पहिल्या दिवसापासून सांगत आहे की, माझा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. सत्य लवकर बाहेर येईलच. एक महिला खेळाडू या नात्याने मी नेहमीच सगळ्या महिला खेळाडूंसोबत आहे, त्यांच्या पाठीशी आहे. पण मी आंदोलनाच्या केव्हाही बाजुची नव्हते. मी आंदोलन करणाऱ्या कुस्तीगीरांना म्हटले होते की, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा यांना भेटले पाहिजे. त्यातून समस्येवर तोडगा निघू शकेल.

पण तुम्हा कुस्तीगीरांना काँग्रेसचे दीपेंदर हुडा, काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी आणि त्यांचे सहकारी यांच्यावर विश्वास होता. मात्र आता लोकांना विरोधकांचा खरा चेहरा उघड झाला आहे. आता त्यांनी लोकांसमोर येऊन सैनिक, शेतकरी आणि महिला कुस्तीगीरांच्या भावनाचा राजकारणासाठी कसा उपयोग करून घेतला हे सांगावे.

हे ही वाचा:

नेताजी सुभाषचंद्र बोस असते तर देशाची फाळणी झालीच नसती!

‘आपत्ती व्यवस्थापनात भारत एक मोठी जागतिक शक्ती’

बिहारमध्ये उष्माघाताने २४ तासांत ३५ जणांचा मृत्यू

सुट्टीवर गेलेल्या उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; मनिषा कायंदे शिवसेनेत जाणार

या आंदोलनासाठी बसलेल्या कुस्तीगीर महिला राजकीय लाभासाठी हे करत आहेत, हे स्पष्ट दिसत होते. आज तुमचा व्हीडिओ सगळ्यांसमोर आहे. आता लोकांना कळायला लागले आहे की, तुम्ही नव्या संसद भवनाचे उद्घाटन होत असताना जे आंदोलन केलेत आणि गंगेत आपल्या पदके सोडून देण्याचा जो निर्णय घेतलात त्यामुळे देशाची कशी नाचक्की झाली. या सगळ्या प्रकारावरून एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे तुम्ही काँग्रेसच्या हातातील बाहुले आहात. आता तुम्हाला पुढे येऊन तुमच्या आंदोलमामागील सत्य लोकांना सांगायला हवे.

Exit mobile version