महाराष्ट्र विधानसभा निवडणुक पार पडली असून यात महायुतीला दमदार यश मिळाले. या निवडणुकीत व्होट जिहादचा मुद्दा पुन्हा एकदा डोकावला होता. अशातच निवडणुकीच्या प्रचार काळात ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे प्रमुख सज्जाद नोमानी यांनी एक व्हिडीओ शेअर करत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला समर्थन जाहीर केलं होतं. महाराष्ट्रात भाजपाचा पराभव झाला तर, दिल्लीमधले त्यांचे सरकार अधिक काळ टीकू शकणार नाही. त्यामुळे आपल्या निशाण्यावर फक्त महाराष्ट्राचे सरकार नाही, तर दिल्लीही आहे, अशा आशयाचा तो व्हिडीओ होता. याच व्हिडीओवरून भाजपने महाविकास आघाडीला लक्ष्य केले होते. यानंतर विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सज्जाद नोमानी यांनी त्यांच्या भूमिकेवरून पलटी मारली आहे.
ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे प्रमुख सज्जाद नोमानी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपला मतदान करणाऱ्या मुस्लिमांवर बहिष्कार टाकण्याच्या विधानाबद्दल माफी मागितली आहे. माझे विधान कोणत्याही समाजाच्या विरोधात नव्हते वा कोणत्याही प्रकारचा फतवा नव्हता, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या नावाचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
“भाजपला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिमांवर बहिष्कार टाकण्याबद्दल जे माझे विधान सध्या चर्चेत आहे ते एका विशेष संदर्भाने अनेक लोकांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिले गेले होते. हे ते लोक होते, ज्यांना लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या मुलभूत अधिकारापासून रोखले गेले होते. माझी प्रतिक्रिया त्या लोकांसाठी होती, जे भारताच्या सर्वसामान्य नागरिकांना संविधानिक अधिकारापासून रोखत होते. त्यामुळे त्या संदर्भाशिवाय माझ्या वक्तव्याकडे बघणे चुकीचे होईल. माझे विधान महाराष्ट्र निवडणूक २०२४ च्या खूप आधी सप्टेंबर २०२४ मधील आहे,” असे सज्जाद नोमानी यांनी म्हटले आहे.
पुढे त्यांनी म्हटले आहे की, “माझे विधान कोणत्याही समाजाविरोधात अजिबात नव्हते. माझा तसा कोणताही उद्देश नव्हता, ना कोणत्याही प्रकारचा फतवा होता. तरीही जर माझ्या या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माझे शब्द मागे घेतो आणि बिनशर्त माफी मागतो. मी नेहमी सत्य आणि न्यायासाठी संघर्ष करत आलोय आणि मी नेहमी त्या व्यक्तीला विरोध केला आहे, ज्याने सर्वसामान्य माणसांना त्रास दिला आहे. मग तो मुसलमान असो वा अन्य कुणी,” अशी भूमिका सज्जाद नोमानी यांनी मांडली आहे.
मेरा बॉयकॉट वाला बयान काफ़ी चर्चा में है। ये बयान किसी समाज के ख़िलाफ़ नहीं था या किसी प्रकार से फ़तवा नहीं था। फिर भी यदि किसी की भावनाएँ आहत हुई हैं तो मैं अपने शब्द्ध वापिस लेता हूँ और बिनशर्त माफ़ी माँगता हूँ। पत्र में विस्तार से पढ़ें ⬇️ pic.twitter.com/exRE2KzYcJ
— Sajjad Nomani (@msajjadnomani) November 23, 2024
हे ही वाचा..
आता नवी आवई म्हणे अनुसूचित जमाती हिंदू नाहीत ? !
पंत ठरला श्रीमंत, आयपीएलच्या इतिहासातील महागडा खेळाडू!
मतदारांनीच दिली शरद पवारांना सक्तीची निवृत्ती
आंध्र प्रदेशात बसची ऑटो रिक्षाला धडक बसून ७ जण ठार
सज्जाद नोमानी यांचे विधान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रचंड वादग्रस्त ठरले होते. भाजपला मतदान करणाऱ्या मुस्लिमांवर बहिष्कार टाका. भाजपला मतदान करू नका. महाविकास आघाडीला साथ द्या, असे त्यांनी व्हिडीओमध्ये म्हटले होते. दरम्यान, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनीही ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे प्रमुख सज्जाद नोमानी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून कारवाई करण्याची मागणी केली होती. मुस्लिमांचा धार्मिक भावना भडकवणे, द्वेषयुक्त भाषण करणे, ज्या मुसलमानाने भाजपचे समर्थन केले त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार घालण्याचे आवाहन करणे, वोट जिहाद आवाहन करणे अशा तक्रारी केल्या आहेत.