‘या’ दिवशी होणार ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

‘या’ दिवशी होणार ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

लातूरमधील उदगीरमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले- पाटील यांनी ‘टीव्ही ९’शी बोलताना यासंबंधीची माहिती दिली. उदगीर येथील ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कथाकार आणि लेखक भारत सासणे यांची निवड झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच आले होते.

उदगीरमध्ये होणारे ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे २२ एप्रिल ते २४ एप्रिल दरम्यान होणार आहे. उदगीरमधील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही संस्था ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची निमंत्रक आहे. या संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांनी भारत सासणे यांची पुणे येथील घरी त्यांची भेट घेतली आणि संमेलनाचे निमंत्रण व अभिनंदन पत्र देण्यात आले.

साहित्य संमेलन हे पहिल्यांदा लातूर जिल्ह्यात होणार असून उदगीर हा सीमावर्ती भाग आहे. या परिसरात मराठी, उर्दू, तेलगु आणि कन्नड या भाषा बोलल्या जातात. याच पार्श्वभूमीवर संमेलनात या सर्व भाषांचा सन्मान होईल, अशा पद्धतीने कार्यक्रमाची आखणी करण्यात येणार आहे, अशी माहिती निमंत्रकांनी संमेलनाच्या अध्यक्षांना दिली आहे.

हे ही वाचा:

काय आहे SPG सुरक्षा कवच?

नेत्यांनी अनोख्या पद्धतीने सोडवला वाद…

चंदीगड महापालिकेत पुन्हा भाजपाचाच महापौर

कोविडच्या सावटामध्ये ‘या’ नव्या नियमांसह पार पडणार पाच राज्याच्या निवडणूका

९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद निवडीसाठी उदगीरमध्ये बैठक झाली. २ जानेवारी रोजी ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. ९४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्येच ९५ वे साहित्य संमेलन हे लातूरच्या उदगीरमध्ये होणार असल्याचे सांगितले होते. पुढील साहित्य संमेलन चार महिन्याच्या आत होणार असल्याची माहिती नाशिक येथील साहित्य संमेलनामध्ये देण्यात आली होती.

राज्यात कोरोनाची परिस्थिती पाहता यंदाही साहित्य संमेलनावर कोरोनाचे सावट असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे संमेलन कदाचित मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडू शकते. कोरोनाची तिसरी लाट ओसरली, तर संमेलन मोठ्या उत्साहात साजरे होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

Exit mobile version