माझ्या कारकीर्दीला आधार देणारा दिलदार माणूस!

प्रखर राष्ट्रवादी, माणसं जोडणारा आणि कोणतीही पार्श्वभूमी नसताना स्वत:चे विश्व निर्माण करणारा माणूस

माझ्या कारकीर्दीला आधार देणारा दिलदार माणूस!

प्रशांत कारुळकर

सहारा उद्योगसमुहाचे प्रमुख सहाराश्री सुब्रता रॉय यांचे मंगळवारी निधन झाले. सुब्रता रॉय यांच्या निधनानंतर देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मला तर अत्यंत ठामपणे वाटते की उद्योगजगताचे मोठे नुकसान झालेले आहे. माझी वैयक्तिक हानी झालेली आहे. जग त्यांच्याकडे ज्या नजरेने पाहते आहे, त्यापेक्षा ते खचितच खूप वेगळे होते. प्रखर राष्ट्रवादी, माणसं जोडणारा आणि कोणतीही पार्श्वभूमी नसताना स्वत:चे विश्व निर्माण करणारा हा माणूस होता.
काही वर्षांपूर्वी मी त्यांच्या संपर्कात आलो. एक नाते तयार झाले. त्यावेळी मी उद्योगक्षेत्रात नवखा होतो. अशावेळी योग्य मार्गदर्शन करणारे, पाठीवर हात ठेवून प्रोत्साहन देणाऱ्यांची गरज असते. सहाराश्रींनी मला तो आधार दिला. त्यातून आमची जवळीक निर्माण झाली.

सुब्रता रॉय यांच्या आयुष्याचा प्रवास जेव्हा पाहतो तेव्हा त्यांनी अगदी शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण केले. संघर्ष करत हा उद्योगसमूह उभा केला. ती गोष्ट माझ्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरली. माझी सुरुवातही अशीच शून्यातून झाली. त्यावेळी सुब्रता रॉय यांच्या या संघर्षमय प्रवासातून खूप काही शिकता आले. त्यांच्याशी जेव्हा जेव्हा संवाद साधला तेव्हा त्यातून सकारात्मक असे खूप काही घेता आले.

सात वर्षांपूर्वी मी वसईतील त्यांची सुमारे २०० एकर जमीन खरेदी केली. या जमीनीकडे त्यावेळच्या अनेक बड्या बिल्डरचा डोळा होता. परंतु सहाराश्रींनी माझ्यावर विश्वास दाखवला. पूर्ण पाठींबा दिला. त्यामुळेच मी हा सौदा करू शकलो. आयुष्यात एक मोठी झेप घेण्याची संधी मला त्यांनी दिली.

यशाची एकेक शिखरे गाठत असतानाच त्यांना वादविवादांनी, आरोपांनी घेरले. त्यांच्यावर गुंतवणूकदारांचे पैसे हडप केल्याचेही आरोप ठेवले गेले. त्यातून तपास झाला, चौकश्या झाल्या, त्यांनी तुरुंगवासही भोगला. मात्र अगदी गरिबीतून पुढे येत एक नामांकित उद्योगसमूह उभारणाऱ्या व्यक्तीवर हे आरोप का झाले असतील, असा जेव्हा विचार करतो, तेव्हा त्यामागे काही राजकीय कारणे तर नसतील ना अशी शंका मनात येऊन जाते. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या पंतप्रधानपदावरून त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती. विदेशी मूळ असलेल्या व्यक्तीकडे पंतप्रधानपद सोपवू नये अशी त्यांची परखड भूमिका होती. ही भूमिका त्यांना भोवली का? त्यांच्या उद्योग साम्राज्याला घरघर लागण्याचे निमित्त ठरली का? त्यांनी या संकटाचा सामना केला. कायद्याचा ससेमीरा टाळण्यासाठी त्यांनी परदेशाची वाट धरली नाही.

हे ही वाचा:

ऐश्वर्या रायबाबत वादग्रस्त विधान; पाकिस्तानी क्रिकेटपटू अब्दुल रझ्झाककडून माफी!

उबाठा सेनेत उद्धव ठाकरेंसकट सर्व सोंगाडे

सुब्रत रॉय यांनी दोन हजार रुपयांत गोरखपूरमधून व्यवसायाची सुरुवात

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यावर वीजचोरीचा आरोप

सर्वोच्च न्यायालयाने लोकांचे पैसे अदा करण्यासाठी त्यांना त्यांच्या काही मालमत्ता विकण्याची मुभा दिली होती. यापैकी काही मालमत्ता विकण्यासाठी मी त्यांना मदत केली होती. त्यांच्या परीवाराशी माझे संबंध होते. त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले होते तेव्हा मी लखनौला सहारा सिटीमध्ये त्यांची भेट घेतली होती. त्यांचे वागणे कायम कुटुंबाच्या एका सदस्यासारखे होते. मला ते वडीलकीच्या नात्याने अनेकदा मार्गदर्शन करीत असत.

 

भारताबद्दलची त्यांची भूमिका त्यांच्या कृतीतून दिसत होती. त्यांची उभारलेल्या उद्योगसमूहाच्या प्रत्येक वास्तूंमध्ये भारतमातेची प्रतिमा, भारतीय तिरंगा आपल्याला पाहायला मिळतो. मला मनापासून वाटते की, ते एक देशभक्त होते. आज ते हयात नाहीत मात्र त्यांनी माझ्या कारकीर्दीला एका वेगळ्या उंचीवर नेण्यात जे सहकार्य केले, पाठिंबा दिला तो कधीही विसरता येण्यासारखा नाही. एक दिलदार माणूस, एक वडीलधारा गमावला. त्यांना श्रद्धांजली. त्यांच्या सर्व कुटुंबियांना या प्रसंगातून सावरण्याची शक्ती ईश्वराने प्रदान करावी, ही प्रार्थना.

Exit mobile version