दुर्दैव! परदेशी शिक्षण घेण्याचे तिचे स्वप्नही वाहून गेले…

दुर्दैव! परदेशी शिक्षण घेण्याचे तिचे स्वप्नही वाहून गेले…

हृषीकेश येथून गंगा नदीत बुडालेल्या मुंबईतील तीन विद्यार्थ्यांपैकी एक असलेली मुलगी परदेशात शिक्षण घेणार होती, पण तिचे ते स्वप्न उद्ध्वस्त झाले.

मधुश्री खुरसांगे ही विद्यार्थिनी ही इंग्लंडमध्ये उच्च शिक्षणासाठी जाणार होती. केदारनाथ मंदिरामध्ये आशिर्वाद घेण्यासाठी मधुश्री आपल्या मित्र मैत्रिणींसोबत हृषीकेश येथे आली होती. मेलरॉय डांटे, अपूर्वा केळकर आणि मधुश्री खुरसांगे अशी तीन बुडालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.

बुधवारी दुपारी ते सर्वजण गंगा किनारी फिरण्यासाठी आणि स्नानासाठी गेले होते. दोघे जण किनाऱ्यावर थांबले, तर बाकीचे तिघे पाण्यात गेले. अपूर्वा पाण्यामध्ये असताना तिचा पाय घसरला; मेलरॉय डांटे आणि मधुश्री खुरसांगे तिला वाचवण्यासाठी पुढे गेले आणि काही क्षणात ते मुख्य प्रवाहात सापडून दिसेनासे झाले.

गुरुवारीही पोलीस आणि एसडीआरएफच्या तीन तुकड्यांनी हृषीकेश ते हरिद्वार या पट्ट्यात शोध मोहीम सुरू केली होती. सुरू असलेल्या मोहिमेत पावसाचा अडथळा आल्यामुळे संध्याकाळी मोहीम थांबवली. शोध मोहीम शुक्रवारी पुन्हा सुरू होईल अशी माहिती तपोवन पोलीस चौकीचे अधिकारी अनिल भट यांनी सांगितली. मुनी की रेती येथील स्टेशन हाऊस ऑफिसर कमल मोहन सिंग भंडारी यांनी सांगितले की मधुश्री हिचे वडील व्यावसायिक आहेत आणि ती उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जाणार होती.

हे ही वाचा:
…म्हणून तो फिरत होता सैनिकाच्या वेषात!

अहो, लोकलप्रवास निर्णय लवकर घ्या!

रेल्वे आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची.

भारतामध्ये लसीच्या परवानगीसाठी ‘या’ कंपनीकडून अर्ज

तिन्ही विद्यार्थ्यांचे पालक गुरुवारी हृषीकेशला पोहचले आहेत. अपूर्वा, मधुश्री आणि मेलरॉय यांच्यासोबत घडलेल्या दुर्घटनेची माहिती मिळताच त्यांच्या मुंबईतील मित्रांना मोठा धक्का बसला आहे. मधुश्री ही आरोग्यविषयक जागरूक होती आणि तिच्या सोशल मिडियावरून ती त्याबाबत माहितीही द्यायची. तिने ३० किलो वजन कमी केले होते आणि त्यासंदर्भातला तिचा अनुभव तिने सोशल माध्यमातून सांगितला होता. असे तिच्या मित्राने सांगितले.

Exit mobile version