चिपळूणमधील युवा उद्योजक, ‘राक्षस’ या टोपण नावाने फेसबूकवर प्रसिद्ध असणारा आदित्य कुलकर्णी याचे निधन झाले आहे. अभिनेता, वक्ता, लेखक, पत्रकार, उद्योजक असे विविध पैलू त्याच्या व्यक्तिमत्त्वाला होते. आदित्यसारख्या हरहुन्नरी तरुणाच्या जाण्याने समाजातुन हळहळ व्यक्त केली जात आहे.
१५ ऑगस्टचा दिवस साऱ्या देशासाठी महत्वाचा होता. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता. समाज माध्यमांवरही सकाळपासूनच उत्साहाचे, आनंदाचे वातावरण दिसत होते. पण दुपारी आदित्य कुलकर्णी या उद्योजकाच्या निधनाची बातमी आली आणि सारे वातावरणच बदलून गेले. आदित्यचे निधन हे सर्वांसाठी धक्कादायक होते. त्याची ही अकाली एक्झिट सर्वांनाच चटका लावून गेली.
पत्रकारितेतील पदव्युत्तर पदवी घेतलेल्या आदित्यने चिपळूणमध्ये स्वतःचे चायनीज सेंटर सुरू केले होते. पांढरपेशा नोकरीचा मार्ग झुगारून त्याने उद्योजक म्हणून नावारूपाला येण्याला पसंती दिली. त्यासाठी वेळप्रसंगी तो भाजी चिरण्यापासून ते अगदी चायनीज पदार्थ बनवण्यापर्यंत पडेल ते काम करताना दिसला. गेल्या महिन्यात चिपळूणमध्ये आलेल्या पुरामध्ये आदित्यचे प्रचंड नुकसान झाले होते. पण तरीही तो यातून उभा राहिला होता. त्याने त्याचा व्यवसाय पुन्हा नव्या उत्साहाने सुरू केला होता.
हे ही वाचा:
राज्यात एकाच दिवशी तीन ठिकाणी आत्मदहनाचे प्रयत्न
स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाला कोरोनाची लागण
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव की हिरक महोत्सव? उद्धव ठाकरेंचा गोंधळ
पण चिपळूणमध्ये पूर ओसरला असला तरी विविध प्रकारच्या रोगांची साथ पसरली आहे. आदित्यही त्याचाच बळी ठरल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आदित्यला कावीळ झाली होती. पण त्याचे निदान होऊ शकले नाही. त्यात कोविड प्रतिबंधक लस त्याने घेतली. त्यातून त्याला ताप भरला डॉक्टरांकडे गेला असता त्यांनी त्याला इस्पितळात भरती होण्यास सांगितले. त्याच्या शरीरातील प्लेटलेट्स कमी झाल्या होत्या. त्यातच १५ ऑगस्ट रोजी दुपारी आदित्यच्या निधनाची बातमी आली.
आदित्यच्या निधनाने फेसबूकवर हळहळ व्यक्त केली जात आहे. आदित्य एक मुक्त विचारांचा तरूण म्हणून प्रसिद्ध होता. सामाजिक, राजकीय विषयांवर तो कायमच आपले परखड मते निर्भीडपणे मांडत असे. त्याच्या लिखाणाचे अनेक जण चाहते होते. त्याचे फेसबुकवरचे ‘हाॅटेलायन’ हे सदर चांगलेच लोकप्रिय होते.