शिवकथाकार डाॅ.सुमंत टेकाडे यांचे निधन

शिवकथाकार डाॅ.सुमंत टेकाडे यांचे निधन

प्रसिद्ध शिवकथाकार डाॅ.सुमंत टेकाडे यांचे निधन झाले आहे. डाॅ.टेकाडे हे कोरनाचा बळी ठरले. काही दिवसांपूर्वी त्यांना कोविडची बाधा झाल्यानंतर नागपूर येथील रूग्णालयात त्यांच्यावर कोविडचे उपचार सुरू होते. ते उपचारांना चांगला प्रतिसादही देत होते. पण शनिवारी पहाटे त्यांचे निधन झाले.

डाॅ.सुमंत टेकाडे हे महाराष्ट्रातले प्रचलित नाव. तरूण वयात चांगल्या पगाराची नोकरी सोडून शिवचरित्राच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारा एक अवलिया अशी त्यांची ओळख. नागपूरचे रहिवासी असणाऱ्या डाॅ.टेकाडे यांना राष्ट्रसेवेचे बाळकडू हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडू मिळाले. संघाच्या विवीध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या डाॅ.सुमंत टेकाडे यांनी संघ प्रचारक म्हणूनही आपले आयुष्य समाजासाठी वाहून घेतले होते. एमबीए पर्यंत शिक्षण झालेले डाॅ.टेकाडे हे नागपुरच्या एस.पी.जैन महाविद्यालयात प्राध्यापकी करत होते. तिथे विभागप्रमुख म्हणून ते कार्यरत होते. मॅनेजमेंट विषयातली पीएचडी सुद्धा त्यांनी संपादन केली आहे.

हे ही वाचा:

इंडिअनॅपलिस शहरात सिख कर्मचाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार

चिनी दबावाविरुद्ध अमेरिका-जपानची वज्रमूठ

आम्ही न्यायासाठी लढत राहू

भगव्या कफनीने केला त्यांचा घात

शिवाजी महाराजांच्या चरित्रातून सामान्य माणसाला शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. आपल्या दैनंदिन आयुष्यातील अडचणीतून बाहेर पडण्यासाठी शिवचरित्र हे अत्यंत उपयुक्त आहे अशी डाॅ.सुमंत टेकाडे यांची भावना होती. त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्यावर व्याख्याने द्यायला सुरूवात केली. नंतर शिवचरित्राच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे शिवधनुष्यच त्यांनी हाती घेतले. त्यासाठी आपल्या चांगल्या पगाराच्या नोकरीवर त्यांनी पाणी सोडले. देशभर त्यांची व्याख्याने होत असत. टेडएक्स सारख्या व्यासपीठावरही ते अनेकदा वक्ता म्हणून गेले होते. अशा या समाज प्रबोधनाचा विडा उचललेल्या शिवभक्ताच्या अकाली जाण्याने समाजातून शोक व्यक्त केला जात आहे.

Exit mobile version