नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची रविवारी शपथ घेतली. त्यांच्यासह ७२ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर सोमवारी त्यांना खाते वाटपही करण्यात आले. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाच्या खात्यांमध्ये बदल न करता ती खाती त्यांनी पूर्वीच्या मंत्र्यांनाच देऊ केली. यानंतर पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पुन्हा एकदा कामाला लागले असून नवनिर्वाचित मंत्र्यांनी पदभार स्वीकारला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी पुन्हा एकदा मिळाली हा मोठा सन्मान- एस जयशंकर
मंगळवार, ११ जून रोजी एस. जयशंकर यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून तर अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्री म्हणून तर, भूपेंद्र यादव यांनी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री म्हणून पदभार स्वीकारला. “परराष्ट्र मंत्रालयाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी पुन्हा एकदा देण्यात आली हा एक मोठा सन्मान आहे. गेल्या टर्ममध्ये या मंत्रालयाने उत्कृष्ट कामगिरी केली. आपण G-20 चे अध्यक्षपद भूषवले. कोविडची आव्हाने स्वीकारली, मित्र देशांना लस पुरवठा केले. ऑपरेशन गंगा आणि ऑपरेशन कावेरी सारखे महत्त्वपूर्ण ऑपरेशन्स पार पडले,” असं एस जयशंकर म्हणाले.
“कोणत्याही देशात आणि विशेषत: लोकशाहीत, सलग तीन वेळा सरकार निवडून येणे ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे जगाला नक्कीच वाटेल की आज भारतात खूप राजकीय स्थैर्य आहे. पाकिस्तान आणि चीनचा संबंध आहे, त्या देशांसोबतचे संबंध वेगळे आहेत आणि तिथल्या समस्याही वेगळ्या आहेत. चीनच्या संदर्भात आमचे लक्ष सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यावर असेल आणि पाकिस्तानच्या बाबतीत सीमापार दहशतवादाच्या समस्येवर तोडगा काढण्यावर लक्ष असणार आहे,” असं जयशंकर म्हणाले.
हे ही वाचा:
इस्रायल-हमास दरम्यान युद्धविरामाचा प्रस्ताव सुरक्षा परिषदेत संमत!
शीख समुदायाबाबत कामरान अकमलने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा हरभजन सिंगने घेतला समाचार
आस्था जिहादविरुद्ध त्र्यंबकेश्वरमध्ये हिंदू एकटवला
‘सुरक्षित आणि मजबूत भारतनिर्माणाचे कार्य सुरूच राहील’
रेल्वे देशाच्या अर्थव्यवस्थेचा मजबूत कणा- अश्विनी वैष्णव
दुसरीकडे, अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. तसेच त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा कार्यभारही स्वीकारला आहे. यानंतर बोलताना ते म्हणाले की, देशातील जनतेने पंतप्रधान मोदींना पुन्हा देशसेवा करण्यासाठी आशीर्वाद दिला आहे. गेल्या १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेमध्ये विद्युतीकरण, नवीन ट्रॅकचे बांधकाम, नवीन ट्रेनचे बांधकाम, रेल्वे स्थानकांचा पुनर्विकासाचे मोठ काम केले आहे. रेल्वे ही सामान्य माणसाच्या प्रवासाचे साधन आहे. तसेच आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक मजबूत कणा आहे, म्हणून रेल्वेच्या विकासाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी सांगितले.