ऋतुराज बहरला; एका षटकात लगावले ७ विक्रमी षटकार

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील कमाल कामगिरी

ऋतुराज बहरला; एका षटकात लगावले ७ विक्रमी षटकार

महाराष्ट्र क्रिकेट संघाचा सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत उत्तर प्रदेशविरुद्ध कमाल केली. त्याने आपल्या संघाच्या ३३० धावांमध्ये २२० धावांचे खणखणीत योगदान दिले. ५० षटकांच्या या सामन्याच्या ४९व्या षटकात त्याने धुवाँधार फलंदाजी केली.

या षटकात त्याने शिवा सिंगच्या गोलंदाजीवर तब्बल ४३ धावा लुटल्या. आपल्या या नाबाद खेळीमध्ये या षटकात त्याने तब्बल ७ षटकार मारल्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले.

या षटकातील पाचवा चेंडू नोबॉल पडला. त्यामुळे त्याची एक धाव मिळाली. शिवाय, त्याच नोबॉलवर त्याने षटकारही लगावला होता. त्यावर पंचांनी फ्री हिट दिल्यानंतर त्यावरही त्याने षटकारच खेचला. आणि शेवटच्या चेंडूवरही त्याने षटकार मारून ७ षटकारांसह ४२ धावा घेतल्या. नोबॉलच्या एका धावेसह या षटकात तब्बल ४३ धावा घेता आल्या.

हे ही वाचा:

मेहबुबा मुफ्ती यांना २४ तासांत सरकारी घर खाली करावे लागणार

आफताबवर ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप

मुंबईचे अग्निशमन दल चढणार प्रगतीची ऑस्ट्रेलियन ‘शिडी’

‘गांधी हत्येचे धागेदोरे हे काँग्रेसपर्यंत पोहोचतात’

शिवासिंगच्या षटकात ४२ धावा कुटल्यावर त्याचा विक्रम नोंदविला गेला. लिस्ट ए श्रेणीत एकाच षटकात सर्वाधिक धावा नोंदविण्याच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली. एकाच षटकात सर्वाधिक षटकार लगावण्याच्या रोहित शर्माच्या विक्रमाशीही त्याने बरोबरी केली. ऋतुराजने १५९ चेंडूंत २२० धावांची खेळी केली. त्यात १० चौकार आणि १६ षटकारांचा समावेश होता. त्याचा स्ट्राइक रेट १३८.३६ इतका होता. ऋतुराज गायकवाडपाठोपाठ अंकित बावणे आणि अझीम काझी यांनीही प्रत्येकी ३७ धावांची खेळी केली. उत्तर प्रदेशच्या कार्तिक त्यागीने ३ बळी घेतले.

प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने ५ बाद ३३० धावांचा डोंगर रचला. त्यात ऋतुराजच्या २२० धावांचा समावेश होता. त्यानंतर उत्तर प्रदेशने या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना ४७ षटकांत ९ बाद २७१ असे उत्तर दिले होते.

Exit mobile version