तडाखेबंद फलंदाज ऋतुराज गायकवाड याने चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळताना आपल्या फॉर्मचे जबरदस्त प्रदर्शन केले आहे. त्याच्या या खेळीचे सर्वत्र कौतुक होते आहे.
लखनौ सुपर जायन्ट्स संघाविरुद्ध त्याने धुवाँधार फलंदाजी करताना ३१ चेंडूंत ५७ धावा केल्या. त्यामुळे चेन्नईला २१८ अशी मोठी धावसंख्या उभारता आली. पण त्याला उत्तर देताना लखनौ संघाला ७ बाद २०५ धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. पण ऋतुराजच्या या खेळामुळे अनेक आजी माजी खेळाडूंना प्रभावित केले.
भारताचा माजी स्टार सलामीवीर वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, विराट कोहलीचा खेळ पाहताना तुमच्या डोळ्यांना समाधान लाभते, अगदी तीच भावना ऋतुराजच्या बाबतीतही आहे. त्याच्या फटक्यांमध्ये अचूक टायमिंग आहे. तो मोठमोठे फटके खेळत असतो तेव्हाही तो आक्रमक फलंदाज वाटत नाही इतकी त्याच्या फटक्यांमध्ये नजाकत असते. त्याच्या षटकारांमध्येही अचूक टायमिंग दिसते. एकाही फटक्यावेळी त्याने आपली ताकद लावली आहे असे दिसत नाही. अगदी सहजपणे तो चेंडू सीमापार भिरकावून लावतो. फ्लिक, पूल, कट असे सगळ्या प्रकारचे फटके त्याच्या बॅटमधून बाहेर पडतात. स्थानिक क्रिकेटमध्येही तो चमकदार खेळ करतो आणि तिथूनच तो आज या स्तरावर पोहोचला आहे.
हे ही वाचा:
ममता वापरणार योगी आदित्यनाथांचा फॉर्म्युला
कुनो अभयारण्यातील बछड्यांचे होणार आहे बारसे… चला नावे सुचवा!
नाकं उडवणाऱ्यांनी नाकं मुठीत घेतली!
विद्वत्ता, निर्भयतेचे महामेरू भगवान महावीर
सेहवाग म्हणतो की, त्याच्या फलंदाजीचा पाया भक्कम आहे. तो चेंडूसाठी प्रतीक्षा करतो आणि त्यापासून नजर हटणार नाही याची काळजी घेत फलंदाजी करतो. जेव्हा तुम्ही एखादा मोठा खेळाडू खेळताना पाहता तेव्हा तो चेंडूपासून नजर अजिबात हटवत नाही. अगदी तसेच ऋतुराजच्या बाबतीतही आहे. ऋतुराजने या झंझावाती अर्धशतकी खेळीत चार षटकार आणि तीन चौकार लगावले. शिवाय, डेव्हन कॉनवे याच्यासह पहिल्या विकेटसाठी त्याने ११० धावांची भागीदारीही रचली. अवघ्या ९ षटकांत त्यांनी आपल्या संघाला शतकापलिकडे नेले.
इरफान पठाणनेही ऋतुराजचे कौतुक केले आहे. त्याने म्हटले आहे की, गेली तीन वर्षे मी त्याचा खेळ पाहात आहे. त्याच्या प्रारंभीच्या हालचाली थोड्या संथ असतात. पण त्यामुळे जेव्हा वेगवान गोलंदाज चेंडू टाकतो तेव्हा त्याला तो चेंडू खेळण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. अर्थात, फिरकी गोलंदाजीविरुद्धही तो जबरदस्त खेळ करतो.