रशियाचे व्लादिमिर पुतिन पुन्हा राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत!

अपक्ष म्हणून उभे राहणार

रशियाचे व्लादिमिर पुतिन पुन्हा राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत!

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन पुन्हा एकदा राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत उतरणार आहेत. मात्र यंदा ते पक्षाच्या तिकिटावर उभे राहणार नाहीत, अशी माहिती रशियाच्या वृत्तसंस्थांनी पुतिन यांच्या समर्थकांच्या हवाल्याने दिली.सुमारे ७००हून अधिक राजकारणी आणि क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींच्या गटाची शनिवारी मॉस्कोमध्ये भेट झाली. या बैठकीत त्यांनी राष्ट्रपतिपदासाठी पुतिन यांचा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्यावर एकमताने शिक्कामोर्तब केले. पुतिन हे समर्थकांच्या बळावर निवडणूक लढवणार आहेत, पक्षाच्या तिकिटावर नाहीत, असे पुतिन समर्थकांच्या हवाल्यानुसार रशियन वृत्तसंस्थेने स्पष्ट केले.

गेल्या दोन दशकांपासून पुतिन हे एकतर राष्ट्रपती म्हणून किंवा पंतप्रधान म्हणून रशियाच्या सत्तास्थानी आहेत. आता त्यांना आणखी सहा वर्षांचा कार्यकाळ खुणावतो आहे. मार्चमध्ये होणारी निवडणूकही ते सहजच जिंकतील, असे सांगितले जात आहे.पुतिन यांना उमेदवार म्हणून त्यांच्या सत्ताधारी युनायटेड रशिया (यूआर) या पक्षाकडून संपूर्ण पाठिंबा असला तरी ते अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत, असे यूआर पक्षाचे वरिष्ठ अधिकारी अँड्रेय तुर्चाक यांनी सांगितले. ‘पुतिन हे रशियाच्या संस्थापकांपैकी एक आहेत,’ असे सांगून ‘निवडणूक प्रचारात पक्षाचे सुमारे ३५ लाख सदस्य आणि समर्थक सक्रियपणे सहभाग घेतील,’ असे तुर्चाक म्हणाले.

हे ही वाचा:

राज्यातील ग्रामपंचायतींचा कारभार तीन दिवस ठप्प!

गाझा सीमेनजीक आढळला सर्वांत मोठा हमासचा भुयारी मार्ग!

तरुणीला गाडीने धडक देणारा आयएएस अधिकाऱ्याच्या मुलगा अश्वजित अटकेत!

दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग? कराचीच्या रुग्णालयात दाखल

पुतिन यांना समर्थन देणाऱ्या ‘जस्ट रशिया’ पक्षाचे वरिष्ठ नेते सेर्जेई मिरोनोव्ह यांनीही पुतिन हे अपक्ष म्हणून लढतील, असे जाहीर केले. तसेच, त्यांच्या समर्थनासाठी स्वाक्षरी मोहीम राबवली जाईल, असे त्यांनी सांगितले.
७१ वर्षीय पुतिन यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे केवळ औपचारिकता आहे. संपूर्ण सरकार आणि सरकारतर्फे चालवली जाणारी प्रसारमाध्यमे यांचा पाठिंबा आणि सार्वजनिक असंतोषाला मुख्य प्रवाहात थारा नसल्यामुळे पुतिन यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

Exit mobile version