सण हे आपल्या आयुष्यात फार महत्त्वाची भूमिका बजावतात. वातावरणाचा नूर सणामुळे पालटून जातो.
अवघ्या काही दिवसांमध्ये आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. बाप्पाचे आगमन म्हणजे बाजारपेठेतील एक आगळा वेगळा उत्साह आपल्याला दिसून येते. अवघ्या चार दिवसांनी बाप्पा घरात विराजमान होणार म्हणून बाजारपेठाही सज्ज झाल्या आहेत. कोरोनाचे सावट अवघ्या जगावर अजूनही आहे. परंतु तरीही उत्साह मात्र कुठेही कमी दिसत नाही. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे माणसांच्या गर्दीने वाहणारी बाजारपेठ.
सध्याच्या घडीला शहरवासीय गणरायाच्या आगमनासाठी सज्ज झाले असून, आपला गणपती सर्वात वेगळा दिसावा, यासाठी लोकांची बाजारात रीघ लागली आहे. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या डेकोरेशन साहित्य खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. गणेशोत्सवात फुलांचे भाव वाढत असल्याने मखरांना, फुलांच्या माळा घेण्यास ग्राहक सरसावत आहेत; तर विद्युत रोषणाईच्या झगमगाटासाठी विजेच्या चायना माळांना जास्त मागणी दिसून येतेय.
बल्ब्सच्या, पारलाईट, लोप लाइट, ड्रॉप लाईट, स्ट्रिप लाईट आदी प्रकारच्या माळा घरगुती डेकोरेशनसाठी उपलब्ध आहेत. यंदा जय मल्हार, पांडुरंगाच्या अवतारातील, लालबागचा राजा, शिवाजी महाराज, दगडू शेठ, श्री कृष्ण गणेशमूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच शाडूपासून बनवलेल्या मूर्ती, तसेच कागदापासून तयार केलेल्या बाप्पाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत इकोफ्रेंडली मूर्तींची मागणी १० टक्क्यांनी वाढली आहे.
गणेशमूर्तींच्या विसर्जनानंतर होणारे पाण्याचे प्रदूषण, पर्यावरणाची हानी याबाबत अनेक सामजिक संस्था, शाळा, महविद्यालयांतील विद्यार्थी, तसेच मूर्तिकार जनजागृती करत आहेत. शहरात होणाऱ्या जनजागृतीच्या माध्यमातून पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी इकोफ्रेंडली मूर्तीचा वापर करावा, असे आवाहन भाविकांना करण्यात येत आहे.
हे ही वाचा:
मुंबईत डेंग्यू, मलेरियाने काढले डोके वर
नवी मुंबईतून कृषी उत्पन्न बाजार समितीला हलविण्याची तयारी
अफगाणिस्तानात मुलींना शिकवायला महिला आणि नकाब घालणे सक्तीचे!
तसेच कागदाच्या लगद्याने आणि जाड पुठ्ठ्यांनी तयार केलेले मखर बाजारात दाखल झाले आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी या मखरांना बाजारात सर्वाधिक मागणी आहे. थर्माकोलच्या मखरांना पर्याय म्हणून हे मखर बाजारात आले आहेत. पुठ्ठ्यांच्या या मखरांमध्ये विविध प्रकार आहेत. या मखरांच्या किमती १५०० पासून ६५०० रुपयांपर्यंत आहेत.