कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच राज्य सरकारने निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना मॉल मध्ये प्रवेश दिला, रेल्वेने प्रवास करण्यास मुभा देण्यात आली. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करताना दोन लसीचे डोस घेतलेले असतील तरीही आरटीपीसीआर टेस्ट सक्तीची केल्याने चाकरमान्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे गणेशोत्सवात चाकरमान्यांची होणारी गर्दी पाहता महामार्ग आणि रेल्वे स्थानकांमध्ये गोंधळ उडणार आहे. त्यामुळे लसीचे दोन डोस घेऊन १४ दिवस झालेल्यांना विना अट प्रवेश देण्याची मागणी केली जात आहे.
मागच्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन असल्यामुळे रेल्वे आणि एसटी सेवा पूर्णतः बंद होत्या त्यामुळे चाकरमान्यांना त्यांच्या गावी जायला मिळाले नाही. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना कोरोना होण्याची शक्यता फारच कमी आहे आणि झाल्यास मृत्यूचा धोका नसल्याचे सिद्ध झाले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि आयसीएमआर यांनी लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना देशात सर्वत्र फिरण्याची मुभा दिली आहे. आरटीपीसीआर टेस्टचीही आवश्यकता नसल्याचेही जाहीर केले आहे.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंचा मोगली वरवंटा हिंदू समाजावर चालतोच आहे
लसीचे दोन्ही डोस घेऊनही दहीहंडीला परवानगी नाहीच
जातिनिहाय जनगणनेबाबत लवकरच निर्णय
महेश मांजरेकरांना कर्करोगाचे निदान
अनेकांनी गणपतीसाठी गावी जायचे म्हणून लसीचे दोन्ही डोस आधीच घेतले आहेत. रेल्वेनेही कोकणसाठी २०० हून अधिक अतिरिक्त गाड्या सोडल्या आहेत. एसटी महामंडळानेही दोन हजारांहून अधिक गाड्या सोडल्या आहेत आणि चाकरमान्यांनी या गाड्यांचे आरक्षणही केले आहे. आरटीपीसीआर टेस्टची सक्ती केल्यास केवळ कशेडी किंवा खारेपाटण या तपासणी नाक्यावरच नाही तर संपूर्ण महामार्गावर वाहतूक कोंडीचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागेल.
लसीचे दोन डोस घेतलेल्यांना केंद्र आणि राज्य सरकारने सर्वत्र फिरण्याची मुभा दिली असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरटीपीसीआर टेस्टची सक्ती केली जाते. केंद्र सरकारचा नियम दाखवून गोवा, कर्नाटक आणि इतर राज्यातून येणाऱ्या नागरिकांची टेस्ट केली जात नाही. मग मुंबई आणि पुणे येथील नागरिकांना ही सक्ती का असा सवाल प्रवासी विचारत आहेत.