आरएसएस ते ‘भारतरत्न’… कसा आहे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांचा जीवनप्रवास?

साधारण तीन दशकं देशाच्या राजकारणात सक्रीय

आरएसएस ते ‘भारतरत्न’… कसा आहे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांचा जीवनप्रवास?

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन ही माहिती देत आडवाणी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. लालकृष्ण आडवाणी हे देशाच्या राजकारणातले महत्त्वाचे राजकारणी आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. भाजपाला वाढविण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. साधारण तीन दशकं ते देशाच्या राजकारणात सक्रीय आहेत.

आडवाणी यांचा शैक्षणिक प्रवास

लालकृष्ण आडवाणी यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९२७ रोजी सिंध (आता पाकिस्तानमध्ये) येथे झाला. आडवाणी यांचे शालेय शिक्षण सेंट पॅट्रिक हायस्कूल, कराची येथे झाले. १९३६ ते १९४२ अशी सहा वर्षे त्यांनी तेथे शिक्षण घेतले. भारत छोडो आंदोलनादरम्यान त्यांनी दयाराम गिदुमल नॅशनल कॉलेज, हैदराबाद (आता पाकिस्तानमध्ये) प्रवेश घेतला. देशभक्तीच्या आदर्शांनी त्यांना १९४२ मध्ये वयाच्या १४ व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मध्ये सामील होण्याची प्रेरणा दिली.

राजकारणातील प्रवास

१९४७ मध्ये फाळणीनंतर आडवाणी दिल्लीत आले आणि राजस्थानमध्ये आरएसएसचे प्रचारक बनले. १९४७ ते १९५१ या काळात त्यांनी अलवर, भरतपूर, कोटा, बुंदी आणि झालावाड येथे आरएसएसचे कराची शाखेत सचिव म्हणून संघटन केले. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केल्यानंतर १९५१ मध्ये ते या पक्षात सामील झाले. त्यांची राजस्थानमधील पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.

१९५७ च्या सुरुवातीला अटलबिहारी वाजपेयी यांच्या मदतीसाठी त्यांची दिल्लीला बदली झाली. पुढे १९७० मध्ये ते राज्यसभेचे सदस्य झाले आणि १९८९ पर्यंत त्यांनी या जागेवर काम केले. १९७२ मध्ये त्यांची भारतीय जनसंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली.

आडवाणी यांनी १९८० मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत भाजपाच्या स्थापनेत हातभार लावला. त्यांनी १९९० च्या दशकात वाजपेयींसोबत पक्षाच्या उभारणीत वाटा उचलला. दरम्यान आडवाणी यांची १९७५ मध्ये माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी १९९८ आणि १९९९ मध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये केंद्रीय गृहमंत्री आणि २००२ मध्ये उपपंतप्रधान म्हणूनही काम केले.

रामजन्मभूमी आंदोलन आणि आडवाणी

१९९० च्या दशकात रामजन्मभूमी आंदोलनाचा चेहरा म्हणून त्यांची ओळख बनली. या आंदोलनात त्यांचे नाव समोर आले. राम मंदिराचा सोहळा पार पडल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, “नियतीने ठरवले होते की अयोध्येत श्री रामाचे मंदिर निश्चितच बांधले जाईल. हा क्षण आणल्याबद्दल आणि रामलल्लाचे भव्य मंदिर उभारून त्याचा संकल्प पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन.”

लालकृष्ण अडवाणी यांना १९९९ मध्ये भारतीय संसदीय गटाने ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्काराने सन्मानित केले होते. तर, २०१५ साली त्यांना भारत सरकारने ‘पद्मविभूषण’ पुरस्कारानेही सन्मानित केले होते. अटलबिहारी वाजपेयी सरकारमधील उपपंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ जाहीर झाला आहे. देशाचा सर्वोच्च सन्मान मिळालेले आडवाणी हे सर्वाधिक काळ भाजपाचे अध्यक्ष राहिले आहेत.

हे ही वाचा:

आडवाणीजींना भारतरत्न ही लाखो कार्यकर्त्यांना सुखावणारी बाब

माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना ‘भारतरत्न’

राम मंदिराला ११ दिवसांत ११ कोटी रुपयांची देणगी

मालदीवमधून १० मेपर्यंत भारतीय सैनिक मायदेशी परतणार

लालकृष्ण आडवाणी हे एक महान बौद्धिक क्षमता, भक्कम तत्त्वे आणि सशक्त आणि समृद्ध भारताच्या कल्पनेला अविचल पाठिंबा देणारे व्यक्ती म्हणून ओळखले जातात. राजकारण आणि अडवाणी यांचे एक अतूट नाते असले तरी राजकारणापलीकडील त्यांचे एक वेगळे व्यक्तिमत्त्व आहे. चित्रपट, पुस्तके, खेळ हे देखील राजकारणा इतकेच त्यांच्या आवडीचे विषय आहेत.

Exit mobile version