प्रसिद्ध दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांचा राईज रोअर रिवोल्ट अर्थात आर आर आर हा चित्रपट सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नव नवे विक्रम प्रस्थापित करताना दिसत असून आजवरच्या भारतीय चित्रपटांच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणारा पाचव्या क्रमांकाचा चित्रपट ठरला आहे. आमिर खानच्या पिके या चित्रपटाला मागे टाकत आर आर आर ने हा विक्रम साध्य केला आहे.
रामचरण आणि एनटीआर ज्युनियर यांच्या प्रमुख भूमिका असलेला आर आर आर हा चित्रपट २४ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटाचं प्रदर्शन होण्या आधीपासूनच या चित्रपटाविषयी खूप जास्त चर्चा रंगली होती. हा चित्रपट राजामौली यांच्या बाहुबली १ आणि बाहुबली २ या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडेल असा अंदाज तज्ञ व्यक्त करत होते.
हे ही वाचा:
‘काही लोकांचा नखं कापून शहीद होण्याचा प्रयत्न’
माननीय बाळासाहेब, जमल्यास उद्धवजींना हिंदूंबाबत सुबुद्धी द्या
कामावर रुजू व्हा, मुंबई उच्च न्यायालयाच्या एसटी कर्मचाऱ्यांना सूचना
‘संजय राऊत, मुख्यमंत्री ठाकरेंना पुरावे द्या; टाईमपास करून वेळ घालवू नका’
प्रदर्शना पासूनच प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. अवघ्या १३ दिवसात या चित्रपटाने तिकीटबारीवर ९०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली असून एक हजार कोटींचा गल्ला जमा होण्याकडे चित्रपटाची वाटचाल सुरू आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषांत प्रदर्शित झाला आहे.यापैकी हिंदीमध्ये चित्रपटाने दोनशे करोड पेक्षा अधिक कमाई केली आहे.
आंध्र प्रदेश मधील स्वातंत्र्यसेनानी अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या दोन व्यक्तिमत्त्वांच्या आधारे गुंफलेली काल्पनिक कथा आर आर आर या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. रामचरण आणि एनटीआर ज्युनियर यांच्यासोबतच आलिया भट, अजय देवगण, श्रिया सरन यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीचा खर्च अंदाजे साडे चारशे ते पाचशे कोटी असल्याचे समजते.