विश्वविख्यात फुटबॉलपटू क्रिस्तिआनो रोनाल्डो याची घरवापसी झाली आहे. रोनाल्डो हा पुन्हा एकदा मँचेस्टर युनायटेड संघाकडून खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. रोनाल्डोच्या या पुनरागमनासाठी जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेड संघाच्या चाहत्यांकडून या बद्दल भरभरून बोलले जात आहे. तर रोनाल्डोचे अनेक आजी-माजी सहकारीही व्यक्त होत आहेत. पण पहिल्यांदाच रोनाल्डोने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
रोनाल्डोने त्याच्या सोशल अकाउंट्स वरून ही पोस्ट केली आहे. त्याने या पोस्टच्या शेवटी एक महत्वाचे वाक्य लिहिले आहे. यात त्याने आपले मँचेस्टर युनायटेड संघात परतणे एका विशेष व्यक्तीला समर्पित केले आहे. ती व्यक्ती म्हणजे मँचेस्टर युनायटेड संघाचे माजी प्रशिक्षक सर ऍलेक्स फर्ग्युसन. ऍलेक्स फर्ग्युसन हे आजवरच्या फुटबॉल इतिहासातील सर्वात यशस्वी प्रशिक्षकांपैकी एक मानले जातात. रोनाल्डो जेव्हा मँचेस्टर युनायटेड कडून खेळात होता तेव्हा सर ऍलेक्स हे संघाचे प्रशिक्षक होते. रोनाल्डोला घडवण्यामध्ये त्यांचा महत्वाचा सहभाग मानला जातो. म्हणूनच रोनाल्डोने एक भावनिक पोस्ट लिहून त्यांना समर्पित केली आहे.
हे ही वाचा:
लोहमार्ग पोलिसांना हवी पुरेशा मनुष्यबळाची सुरक्षा
अनिल परबांची चौकशी करा! लोकायुक्तांना राज्यपालांचा हिरवा कंदिल
भारताचे पुन्हा एकदा विक्रमी लसीकरण
रोनाल्डो लिहितो…
“प्रत्येकजण जो मला ओळखतो, त्याला मँचेस्टर युनायटेडवरील माझ्या कधीही न संपणाऱ्या प्रेमाबद्दल माहिती आहे. मी या क्लबमध्ये घालवलेली वर्षे कमालीची होती. आम्ही एकत्र केलेला प्रवास या महान संस्थेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेला आहे.
मँचेस्टर युनायटेड येथे माझे परतणे जगभर जाहीर झाल्यानंतरच्या माझ्या भावना मी व्यक्त करू शकत नाही. माझ्यासाठी हे स्वप्न सत्यात उतरण्या सारखे होते. जेव्हा जेव्हा मी मँचेस्टर युनायटेडच्या विरोधातही खेळलो तेव्हाही मला क्लबच्या समर्थकांकडून कायम प्रेम आणि आदर मिळाला. मी १००% याचे स्वप्न पाहिले होते.
माझी पहिली डोमेस्टिक लीग, पहिला कप, पोर्तुगाल संघासाठी माझी पहिल्यांदा झालेली निवड, पहिली चँम्पियन्स लिग, माझा पहिला सुवर्ण बूट आणि पहिला बलोन दि ओर या साऱ्यांचा जन्म माझ्या आणि रेड डेव्हील्सच्या विशेष अशा कनेक्शन मधून झाला आहे. भूतकाळात इतिहास रचला गेला होता आणि पुन्हा एकदा इतिहास रचला जाईल. हा माझा शब्द आहे.
मी इथेच आहे
मी जिथला आहे तिथे मी परतलोय
चला पुन्हा एकदा हे संभव करूया
सर ॲलेक्स, हे तुमच्यासाठी….”