ओव्हल कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने इंग्लंड विरोधात आघाडी घेतली आहे. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा याच्या ऐतिहासिक शतकाच्या जोरावर भारत सुस्थितीत पोहोचला आहे. सामन्याचे अजून दोन दिवस बाकी आहेत. तरी सध्याची स्थिती बघता सामन्याचा महत्वाचा असा तिसरा दिवस भारताने आपल्या नावे केला आहे. त्यामुळे सामन्याचे पारडे भारताच्या बाजूने झुकले आहे असेच म्हणावे लागेल.
ओव्हल कसोटीत दुसऱ्या डावात भारताची फलंदाजी खूपच आश्वासक होताना दिसत आहे. तिसऱ्या दिवसा अखेर भारताने धावफलकावर २७० धावा चढवल्या असून भारताचे तीन फलंदाज बाद झाले आहेत. या कामगिरीसह भारताने इंग्लंडवर १७१ धावांची आघाडी घेतली आहे. भारताचे आघाडीचे तीन फलंदाज लोकेश राहुल, रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी चांगली कामगिरी करत भारतीय डावाचा पाया मजबूत रचला आहे.
हे ही वाचा:
शिवसेना आमदाराच्या उपस्थितीत ‘जुलूस जबरदस्ती’
जावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा
बोरिवलीत इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग, जीवितहानी टळली
गौहत्या करणाऱ्या जावेदला इलाहाबाद उच्च न्यायालयाने फटकारले
या सामन्यात रोहित शर्माने १२७ धावांची अतिशय महत्त्वपूर्ण अशी खेळी केली असून त्याचे हे भारता बाहेरचे पहिले कसोटी शतक ठरले आहेत. रोहितने २५६ चेंडूत १२७ धावा केल्या. ज्यामध्ये १४ चौकार आणि १ षटकार आहे. रोहितच्या या खेळीला सुरुवातीला के.एल. राहुल आणि त्यानंतर चेतेश्वर पुजारा यांनी चांगली साथ दिली. सलामीला आलेल्या रोहित आणि राहुलने ८३ धावांची भागीदारी रचली. ज्यामध्ये राहुलचे ४६ धावांचे योगदान आहे. तर राहुल बाद झाल्यावर पुजारानेही रोहितला चांगली साथ दिली. त्या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १५३ धावांची भागीदारी रचली. चेतेश्वर पुजाराने ही अर्धशतकी खेळी केली असून त्याने ६१ धावा केल्या आहेत.
भारताच्या या फलंदाजीचा तडाखा रोखायला इंग्लंडच्या गोलंदाजांना म्हणावे तसे यश आले नाही. इंग्लड कडून रॉबिन्सनने दोन तर अँडरसनने एक बळी मिळवला. पण ती कामगिरीही त्यांच्या प्रतिभेला साजेशी अशी नव्हती. इंगलंड संघावर दबाव वाढत चालला आहे. सध्या भारताकडून कर्णधार विराट कोहली आणि रवींद्र जडेजा हे मैदानावर नाबाद टिकून आहेत.