सोमवारी राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीची बैठक दिल्लीत होत आहे. निवड समितीचे अध्यक्ष व माजी क्रिकेटपटू अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. त्यात आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या संघनिवडीवर चर्चा होणार आहे. कर्णधार रोहित शर्मा या बैठकीला हजर राहणार आहे, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी म्हटले आहे.
बीसीसीआयने अद्याप आशिया चषक आणि वर्ल्डकप अशा दोन्ही स्पर्धांसाठी संघ जाहीर केलेला नाही. त्यामुळे या दोन स्पर्धांसाठी या बैठकीत चर्चा होणार की केवळ आशिया चषक स्पर्धेसाठी संघ निवडण्यात येणार हे पाहावे लागेल.
अनेक प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापतींमुळे आशिया चषक स्पर्धेसाठी संघनिवड करताना विचार करण्याची गरज आहे. जसप्रीत बुमराह, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर हे भारतीय संघातील प्रमुख खेळाडू आहेत. दुखापतीमुळे ते ग्रस्त आहेत. अर्थात, त्यापैकी बुमराहने आयर्लंडच्या दौऱ्यातून पुनरागमन केले आहे. त्यात तो भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे.
दरम्यान, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ या देशांनी आपापले संघ जाहीर केले आहेत. आशिया चषक स्पर्धेचे या तिन्ही देशांचे संघ घोषित झालेले आहेत. वर्ल्डकपसाठी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांनीही आपले संघ जाहीर केलेले आहेत.
हे ही वाचा:
बद्रीनाथ महामार्गावरील ७० मीटरचा रस्ता खचला
भारताने विकसित केलेली AI आधारित ‘भाषिणी’ लवकरच येणार
रजनीकांतचा नवा चित्रपट पाहणार योगी; लखनऊमध्ये होणार शो
रतन टाटा महाराष्ट्राचे पहिले ‘उद्योगरत्न’
१९ जुलैला बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी आगामी आशिया कप स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमानुसार चार सामने पाकिस्तानात होणार असून भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होतील. एकूण ९ सामने त्यात होणार आहेत. भारत अ गटात असून पाकिस्तान आणि नेपाळ हे संघ या गटात आहेत. तर ब गटात बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे.
३० ऑगस्टपासून या स्पर्धेला प्रारंभ होत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ सप्टेंबरला सामना होत आहे. ही लढत श्रीलंकेतील कँडी येथे होईल. स्पर्धेची सलामी पाकिस्तान आणि नेपाळ या संघांत होईल. मुलतान पाकिस्तान येथे ही लढत होणार आहे. श्रीलंकेने ही स्पर्धा ६ वेळा जिंकली आहे. तर भारताने ही स्पर्धा ७ वेळा जिंकली आहे. श्रीलंका हा गतविजेता संघ आहे.