25 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषफलंदाजीतला मोहिनी अवतार!!

फलंदाजीतला मोहिनी अवतार!!

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने आज ३५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख.

Google News Follow

Related

आपण काही हिंदी किंवा दाक्षिणात्य चित्रपटांमधे पाहिलं असेल. चित्रपटाच्या नायकाच्या खणखणीत कानशीलात बसते पण तरिही तो मनोमन खुश असतो आणि हसत असतो कारण त्याचा गाल जरी लाल झाला असला तरी त्यानिमीत्ताने त्या चित्रपटाच्या सुंदर नायिकेने आपल्या नाजूक हाताने त्याला स्पर्श केलेला असतो. तीच्या हातातली नाजूकता आपल्या गालावर एवढी प्रकर्षाने दिसेल याची त्या नायकाला कल्पनाच नसते. पण तरिही ते तो मिरवत असतो जणू आपल्या प्रेमपत्राला मिळालेले तिचे ते होकारार्थी उत्तर आहे.

त्याक्षणी त्या नायकावर एकाच वेळी दोन वार झालेले असतात. एक गालावर तर दुसरा काळजावर. ‘ती पाहताच बाला,कलिजा खलास झाला, छातीत इश्क भाला, की आरपार गेला’ अशी काहीशी त्या नायकाची अवस्था असते. चित्रपटांमधे आजवर कित्येक नायकांनी हे अनुभवलाय. पण रुपेरी पडद्यावरचा हा अनुभव क्रिकेटच्या मैदानामधे आजवर अनेक गोलंदाजांनी घेतलाय. त्यांच्यावर षटकारांचा वर्षाव होत असतो, प्रत्येक फटक्यातून ते भरडले जात असतात पण त्यातही एक वेगळंच समाधान असतं. कारण त्यांच्यावर प्रलय होऊन बरसणारी फलंदाजीतील परमोच्च सुंदरता असते, जीचं नाव रोहित गुरूनाथ शर्मा!!

काही लोकांमुळे अनेक कठीण गोष्टी या अगदी सोप्या आहेत असे वाटू लागते. पु.ल.देशपाडेंमुळे विनोद, किशोरमुळे गाणे,आर.के.लक्ष्मणांमुळे व्यंगचित्र तसं या पठ्ठ्यामुळे फलंदाजीबद्दल वाटू लागतं. जगभरात जशा निरनिराळ्या विश्वसुंदरी निवडणाऱ्या स्पर्धा होतात तशा स्पर्धा जर फलंदाजीच्या व्हायला लागल्या तर त्या सगळ्या स्पर्धांचे विजेतेपद या एका माणसाच्या नावावर असेल. माधुबालापासून माधुरीपर्यंत सारे सौंदर्य याच्या फलंदाजीत खच्चून भरलाय.

हा माणुस फलंदाजीतला मोहिनी अवतार आहे. मोहिनीच्या सौंदर्यावर असूर अशाप्रकारे भाळले होते की त्यांच्यासोबत नेमके काय होते आहे हेच त्यांना कळत नव्हते. अगदी तसंच याच्या फलंदाजीच्या सौंदर्यावर गोलंदाज असे भाळतात की त्यांच्यासोबत नेमकं काय होतं आहे हे त्यांना पण कळत नसतं. ते द्विधा मनस्थितीत असतात. नेमका चौकार, षटकार मारला म्हणून त्रागा करावा की त्या फटक्यातील सौंदर्याचे कौतुक करावे. आपल्याकडे अनेक ठिकाणी ‘कातील हसिना’ म्हणून जे वर्णन आढळतं ते क्रिकेट विश्वात रोहितच्या फलंदाजीला म्हटलं पाहिजे.

एखाद्या स्त्रीचे सौंदर्य जसे तिच्या अंगावरील आभूषणांनी किंवा केसातील गजऱ्याने खुलते तसे रोहितच्या फलंदाजीतील सौंदर्याला चार चांद लावते त्याचे टाईमिंग. विराट कोहलीला एकदा एका मुलाखतीत विचारण्यात आले होते, “रोहित शर्माकडे बाकीच्या फलंदाजांपेक्षा एक सेकंद जास्त आहे का? तेव्हा विराट म्हणाला होता “नाही…दीड सेकंद अधिक आहेत.”

विराटाचे हे उत्तर ऐकताना कितीही साधे वाटले तरीही प्रत्यक्षात मात्र ते तसे नाही. आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्याला एक-दीडच काय तर आठ दहा सेकंद पण फार जास्त वाटत नाहीत. पण क्रिकेटच्या मैदानात आणि त्यातही फलंदाजी करताना हा अधिकचा अर्धा सेकंदही तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे आणि खास बनवून जातो.

हे ही वाचा:

जॅकलिन फर्नांडिसच्या संपत्तीवर ईडीची टाच

अमेरिकेतून कुरिअरमधून आणले २७ किलो मारीजुआणा ड्रग्ज; एकाला अटक

MPSC च्या परीक्षेत सांगलीचा प्रमोद चौगुले राज्यात प्रथम; रुपाली माने मुलींमध्ये पहिली

टाटा मोटर्स लवकरच बनवणार इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी

जेव्हा ताशी १४०-१५० किलोमीटरच्या गतीने गोलंदाज चेंडू फेकत असतो तेव्हा त्या चेंडूची गती, टप्पा, उसळी, स्विंग इत्यादी सगळ्या गोष्टी हेरून त्यानुसार फटका ठरवण्यासाठी फार कमी वेळ फलंदाजाकडे असतो आणि तेव्हा हा अधिकच अर्धा सेकंद फलंदाजासाठी फार जास्त महत्वाचा ठरतो. रोहितकडे हेच वरदान आहे.

पण सौंदर्यालाही अनेकदा दृष्ट लागण्याची भिती असते. त्यामुळे आपल्याकडे दृष्ट लागू नये म्हणून काळा तीट लावण्याची पद्धत आहे. रोहितदेखील त्याच्या फलंदाजीच्या बाबतीत ही पुरेपूर काळजी घेतो आणि स्वतःच त्याच्या फलंदाजीला काळा तीट लावतो. विकेट फेकून. असे अनेक तीट याने आजवर लावून घेतले आहेत. आजही अधुन मधून तसे तीट लावणे सुरूच असते. कारण भरात असलेल्या रोहित शर्माला गोलंदाज आऊट करूच शकत नाही. त्यामुळे त्याची विकेट घेणारा गोलंदाज नसतोच…तो स्वतः रोहितच असतो.

पण आता रोहितकडून असलेल्या अपेक्षा वेगळ्या आहेत. रोहित जितका फलंदाज आहे तितकाच चाणाक्ष असा कर्णधार आहे. हे त्याने आजवर अनेकदा सिद्ध केलाय. त्याची ही क्षमता बघूनच त्याला भारतीय संघाचा तिन्ही क्रिकेट प्रकारातील कर्णधार जाहीर केले आहे. कर्णधार म्हणून त्याच्या कारकिर्दीची सुरुवातही चांगली झाली आहे.

भारतीय संघाचा कर्णधार म्हणून आत्तापर्यंत त्याने पराभव पाहिलेला नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई संघ चांगला खेळत नाहीये आणि अद्याप एकही सामना जिंकला नाहीये . पण म्हणून आधीच्या ५ चषकांचे विजेतेपद आणि त्यातली रोहितची भूमिका दुर्लक्षित करता येत नाही. आता हीच गोष्ट भारतीय संघाचे नेतृत्व करताना सिद्ध करायची वेळ आली आहे. २०१३ नंतर भारतीय संघाने एकही ICC Tournament जिंकलेली नाही. काही हाता तोंडाशी आलेले घास पोटात जाऊ शकले नाहीयेत. त्यामुळे हा दुष्काळ संपवण्याची जबाबदारी रोहितच्या खांदयावर आहे. ती त्याने लीलया पार पाडावी आणि क्रिकेटप्रेमी भारतीयांना पुन्हा एकदा जल्लोषाची संधी द्यावी हीच अपेक्षा आहे.

२०१३ नंतर रोहित शर्मा हा भारतीय संघाचा अविभाज्य भाग झाला आहे. सुरुवातीला पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये आणि नंतर लाल चेंडूच्या क्रिकेटमध्येही रोहितने आपले स्थान बळकट केले आहे. भारतीय संघासाठी सलामीला यायला लागल्यापासून रोहित शर्माने यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत. एकदिवसीय सामन्यात तीन वेळा २०० पेक्षा अधिक धावा, विश्वचषकात सर्वाधिक शतके, एकाच विश्वचषकात सर्वाधिक शतके, एकदिवसीय सामन्यात २६४ धावा करत सर्वाधिक धावांचा विक्रम, असे अनेक विक्रम रोहितने रचले आहेत. त्यामुळे आपल्या या अनुभवाचा आणि कौशल्याचा फायदा भारतीय क्रिकेट संघाला व्हावा अशी संघ व्यवस्थापनाची अपेक्षा असेल.

आज रोहीत शर्माने वयाची ३४ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यामुळे आता येणाऱ्या आयसीसी स्पर्धा या त्याच्यासाठी पहिली आणि अखेरची संधी असणार आहे. त्यामुळे या संधीचे अस्सल बावनकशी सोने करावे हीच अपेक्षा आहे. बाकी हे फलंदाजीतले सौंदर्य अधिक बहरत जाओ, विरोधकांवर बरसत जाओ आणि ट्रॉफीजच्या बाबतीत भारताची बरकत होवो एवढीच अपेक्षा! यह खूबसूरती सदा आबाद रहे!!

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा