‘अश्विनचा घरी परतण्याचा निर्णय योग्यच!’

भारतीय कर्णधार रोहित शर्मा यांची स्पष्टोक्ती

‘अश्विनचा घरी परतण्याचा निर्णय योग्यच!’

भारताचा फिरकीपटू अश्विन याची आई आजारी असल्याने त्याला इंग्लंडविरोधातील दुसऱ्या कसोटीतून माघार घ्यावी लागली होती. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने आश्विनचा निर्णय योग्यच असल्याचे नमूद केले आहे.

राजकोटच्या कसोटी सामन्यात इंग्लंडविरोधात विजय मिळवल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा पत्रकारांना सामोरा गेला. ‘जेव्हा कसोटी सामन्यादरम्यान तुमच्या सर्वांत अनुभवी गोलंदाजाशिवाय, तुम्हाला खेळावे लागते, तेव्हा ही बाब सोपी नसते. मात्र या सर्व बाबी एकीकडे असतात. कारण काहीही झाले तरी कुटुंब सर्वप्रथम येते. जेव्हा आम्ही ही बाब ऐकली तेव्हा आमच्या मनातही दुसरा कोणताही विचार आला नाही. अश्विनला जे योग्य वाटते, ते त्याने करावे, हीच आमची इच्छा होती,’ असे रोहितने स्पष्ट केले.

‘अश्विन कुटुंबासोबत राहू इच्छित होता, जो अतिशय योग्य निर्णय होता. ते त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी चांगले होते. हेच यावरून सिद्ध होते की तो अतिशय चांगला माणूस आहे. तो कुटुंबाकडे परतल्याचा आम्हाला आनंद आहे,’ असे रोहित म्हणाला.

हे ही वाचा:

टाटा समूहाचे बाजारमूल्य पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त!

केएल राहुल रांची कसोटीत खेळण्यासाठी सज्ज

चंदीगडच्या भाजपा महापौरांचा पदाचा राजीनामा; आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

संदेशखालीतील घटना ‘किरकोळ’

कसोटी सामना चौथ्या दिवशीच संपल्याबाबतही रोहितने मत मांडले. ‘मला वाटलेले की, सामना पाचव्या दिवसापर्यंत चालेल. आम्हाला वाटले की इंग्लंडला पराभूत करण्यासाठी १५० षटके पुरेशी आहेत. आम्ही षटके हातात ठेवणार होतो. आम्हाला आशा नव्हती की, खेळ लवकर संपेल,’ असे रोहित म्हणाला. तर, ‘यशस्वी जयस्वालला खेळू द्या. तो चांगल्या फॉर्मात आहे. प्रत्येकजण त्याच्याबाबतच बोलतोय. मी जास्त काही बोलणार नाही,’ असे रोहितने स्पष्ट केले.

Exit mobile version