काँग्रेस खासदार प्रियंका वाद्रा यांचे पती रॉबर्ट वाद्रा हे पुन्हा एकदा चर्चेत आले असून त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. हरियाणातील शिखोपूर जमीन व्यवहाराशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना दुसऱ्यांदा समन्स बजावले होते. यासाठी मंगळवार, १५ एप्रिल रोजी ते ईडी कार्यालयात हजर झाले होते. समन्स मिळाल्यानंतर वाद्रा त्यांच्या घरातून पायी चालत ईडी कार्यालयात पोहोचले.
रॉबर्ट वाद्रा यांना ८ एप्रिल रोजी या प्रकरणात पहिले समन्स जारी करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी ते गैरहजर राहिले. त्यानंतर दुसऱ्या समन्सला त्यांनी हजेरी लावली असून ते कार्यालयापर्यंत पायी गेले. यावेळी पत्रकारांशी बोलताना वाद्रा म्हणाले की, जेव्हा जेव्हा ते लोकांसाठी काही चांगले करतात तेव्हा विरोधी पक्ष त्यांना दडपण्याचा प्रयत्न करतात. “जेव्हा जेव्हा मी लोकांसाठी बोलतो तेव्हा ते मला दडपण्याचा प्रयत्न करतील. ही राजकीय सूडबुद्धी आहे. ते तपास यंत्रणांच्या अधिकाराचा गैरवापर करतात. मला कोणतीही भीती नाही, कारण माझ्याकडे लपविण्यासारखे काहीही नाही,” असे वाद्रा म्हणाले. वाद्रा यांच्यासोबत असलेल्या काँग्रेस समर्थकांनी केंद्र सरकारकडून विरोधकांवर दबाव निर्माण करण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर केल्याचा आरोप केला.
हे ही वाचा :
ट्रम्प प्रशासनाने हार्वर्ड विद्यापीठाचे २.२ अब्ज डॉलर्सचे अनुदान गोठवले; काय आहे कारण?
इस्रायल- हमासमधील युद्धबंदीची चर्चा फसली; ‘ही’ आहेत कारणे
मध्य प्रदेश: हिंदू धर्माच्या प्रभावामुळे अन्वरने इस्लाम सोडून स्वीकारला सनातन धर्म!
… अन् मोहित्यांना दिसला मोत्यांमध्ये राम
केंद्रीय तपास संस्था वाद्रा यांच्या स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी या फर्ममधील कथित आर्थिक अनियमिततेची चौकशी करत आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, वाद्रा यांच्या कंपनीने फेब्रुवारी २००८ मध्ये ओंकारेश्वर प्रॉपर्टीजकडून गुडगावच्या शिखोपूरमध्ये ३.५ एकरचा भूखंड ७.५ कोटी रुपयांना खरेदी केला होता. त्यानंतर वाद्रा यांच्या कंपनीने ही जमीन ५८ कोटी रुपयांना रिअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज कंपनी डीएलएफला विकली. ही रक्कम लॉन्ड्रिंग योजनेचा भाग असल्याचा संशय असल्याने, केंद्रीय एजन्सी या अचानक झालेल्या नफ्यामागील पैशांचा शोध घेत आहे. त्यांचा जबाब मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) नोंदवला जाणार आहे.