साऊथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक असलेले एम.मणिकंदन यांच्या बद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे.नुकतेच काही दिवसांपूर्वी एम.मणिकंदन यांच्या मदुराई येथील घरी चोरटयांनी दरोडा टाकला होता.यावेळी चोरटे लाखोंची रोकड, सोने व राष्ट्रीय पुरस्कार घेऊन फरार झाले होते.आता याच चोरटयांनी एम.मणिकंदन यांना मिळालेले राष्ट्रीय पुरस्कार पदक परत केले आहेत.कागदावर माफीनामा लिहीत तमिळ दिग्दर्शकाला पुरस्कार परत केले आहेत.मात्र, चोरट्यांचा माफीनामा एक चर्चेचा विषय ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तमिळ दिग्दर्शक मणिकंदन यांच्या मदुराई निवासस्थानातून चोरलेली राष्ट्रीय पुरस्कार पदके चोरटयांनी परत केली आहेत.तसेच त्यांनी माफीनामा पत्र देखील पाठवले आहे.तामिळनाडूमधील मदुराई येथील उसिलमपट्टी या निवासस्थानी ही चोरी झाली होती.चोरटयांनी मौल्यवान वस्तूंसह राष्ट्रीय पुरस्काराचे पदक देखील चोरी केले होते.परंतु, चोरट्यांच्या लक्षात येताच त्यांनी ही पदके एका प्लास्टिक पिशवीमध्ये घातली आणि सोबत माफीच्या चिट्टीसह परत केली.
हे ही वाचा:
शेतकरी आंदोलनात दिसला खलिस्तानी ध्वज!
पंतप्रधान मोदी दोन दिवसीय युएई दौऱ्यावर रवाना!
पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन काम करू!
इंदूरमध्ये भिकाऱ्याने ४५ दिवसांत कमावले २.५ लाख रुपये!
दिग्दर्शक मणिकंदन हे चेन्नईत त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात.तर त्यांच्या पाळीव कुत्र्याला उसिलमपट्टीच्या घरी ठेवण्यात आले आहे.या कुत्र्याची निगा राखण्यासाठी, म्हणजे त्याला खायला घालणे, पाणी पाजणे ही कामे मणिकंदन यांचे मित्र करतात.काही दिवसांपूर्वी पाळीव कुत्र्याला खायला घालण्यासाठी त्यांचे मित्र घरी गेले असता घराचे दरवाजे अगोदरच उघडल्याचे आढळून आले.आत गेल्यावर दागिने, रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तू गायब असल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला.त्यानंतर उसिलमपट्टी पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली.तक्रारीत १ लाख रुपये रोख, १५ तोळे सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू गायब झाल्याचे नमूद करण्यात आले.
पोलीस तक्रारीनंतर काही दिवसांनी पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना त्यांना घराच्या भिंतीला एक पॉलिथिन पिशवी लटकलेली आढळली, ज्यामध्ये मणिकंदनचे राष्ट्रीय पुरस्कार पदक आणि माफीची चिठ्ठी होती.”सर, कृपया आम्हाला माफ करा, आम्ही तुमच्या मेहनतीचे वेतन परत करत आहोत, असे या चिठ्ठीत लिहिले होते. चोरटयांनी त्यांचे राष्ट्रीय पुरस्कार परत केले असले तरी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अद्याप गायब आहे.या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.