मुंबईला पावसाने झोडपले, धो डाला हे मथळे तसे नेहमीचेच. पण नोव्हेंबर महिन्यात मुंबईला धो डाला असा मथळा तसा विरळाच. पण तसे झाले आहे. मुंबईतील प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी पालिकेने चक्क रस्तेच धुवून काढले. धुळीमुळे निर्माण झालेले प्रदूषण आणि त्यातून नागरिकांना सोसावा लागणार त्रास यातून काही प्रमाणात त्यांची सुटका करण्यासाठी पालिकेने रस्तेच धुवून काढले.
सध्या दिल्लीतील प्रदूषणाची चर्चा आहे. मुंबईतही गेल्या काही दिवसांत हवेची स्थिती वाईट असल्याचे वृत्त आहे. सुरू असलेली विकासकामे यामुळे प्रदूषणाची समस्या अधिक बिकट बनली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने रस्ते धुवून धुळीचा होणारा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.
न्यायालयानेही हवेच्या स्थितीबाबत फटकारले होते. त्यामुळे पालिकेने ६० फुटांपेक्षा अधि रुंदीचे रस्ते, वर्दळीचे फूटपाथ पाण्याने धुवून काढले. जवळपास ६५० किलोमीटरचे रस्ते पाण्याने धुतले जाणार आहेत.
मुंबईतील धूळ नियंत्रित करण्यासाठी पावले उचलावीत अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या. त्याप्रमाणे पालिकेने पावले उचलली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पश्चिम उपनगरे सुधाकर शिंदे यांनी बैठक घेऊन रस्ते धुण्यासंदर्भात निर्णय घेतला.
सध्या मुंबईत प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी १२१ टँकर आणि इतर यंत्रांचा वापर केला जाणार आहे. धूळ प्रतिबंधक यंत्रांचा वापर करून ठिकठिकाणी रस्त्यांवर पाण्याचे फवारे मारून रस्ते धुतले जाऊ लागले आहेत.
हे ही वाचा:
महिला सैनिकांसाठी केंद्र सरकारची भेट!
एकनाथांच्या मदतीला एकनाथ धावले!
इस्रायल-हमास वाद जुना आहे पण आता तो शिगेला पोचला!
इस्रायलच्या सैन्यांच्या श्वानांचा क्रूर हल्ला; हमासचे दहशतवादी ठार!
ज्या रस्त्यांवर अशी कारवाई करायची आहे, त्यांची निवड आधीच कऱण्यात आली आहे. ज्या ठिकाणी वाहनांची, नागरिकांची अधिक वर्दळ असते असे रस्ते त्यासाठी निवडण्यात आले आहेत. त्यावर पालिकेने लक्ष केंद्रित करून तिथे पाण्याचे फवारे मारून धूळ कमी करण्यास प्राधान्य दिले आहे. शीव, मुलुंड पश्चिम, कुलाबा, कांदिवली, नेव्ही नगर, कुलाबा, वांद्रे कुर्ला संकुल अशा ठिकाणी हवेतील धुळीकणांचे प्रमाण वाढले आहे. वातावरणात पीएम २.५ हा घटक वाढला आहे. त्यामुळे हवेच्या दृश्यमानतेवर परिणाम दिसत आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. सकाळी धुरक्याचे प्रमाण मोठे असते त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. त्यातून हे प्रदूषण कमी करण्यासाठी मागणी होऊ लागली.