मुंबईतल्या निवासी डॉक्टर्सची महापालिकेकडून लूट?

मुंबईतल्या निवासी डॉक्टर्सची महापालिकेकडून लूट?

कोविडच्या जागतिक महामारीचा सामना करताना डॉक्टरांची भूमिका महत्वाची ठरली आहे. पण शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेकडून मात्र या डॉक्टरांना चुकीची वागणूक दिली जात असल्याचा आरोप होत आहे. या डॉक्टर्सकडून महापालिका चुकीच्या पद्धतीने पैसे उकळत असल्याचाही आरोप केला जात आहे. दीपक मुंढे नावाच्या एका डॉक्टरने ट्विटरवर एक थ्रेड लिहीत महापालिकेवर गंभीर आरोप केले आहेत.

कोविडच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र सर्वात जास्त होरपळून निघत आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण हे सध्या महाराष्ट्रात आहेत. राजधानी मुंबईतही कोरोनाचा हैदोस सुरूच आहे. या कठीण परिस्थितीत डॉक्टर्स हे देवदूताप्रमाणे लोकांचे जीव वाचवत आहेत. पण या डॉक्टरांसोबत शिवसेनेच्या मुंबई महापालिकेकडून चुकीचा व्यवहार केला जात असल्याचा आरोप केला जात आहे.

हे ही वाचा:

१०० कोटींच्या बोजाने दबलेल्या बार मालकांबाबत कळकळ पाहून कंठ दाटून आला

मराठा आरक्षणासाठी नाही, बार मालकांसाठी पवारांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र

परदेशातून महाराष्ट्राला मिळालेल्या मदतीबद्दल मविआत मतभेद

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे विमा संरक्षण अधांतरीच

दीपक मुंढे नावाच्या डॉक्टरनी मुंबई महापालिकेवर गंभीर आरोप करताना असे म्हटले आहे की गेल्या वर्षी मुंबई महापालिकेने डॉक्टरांना दहा हजार रुपये भत्ता जाहीर केला आणि आता महापालिका याच भत्त्याला पगारवाढ समजावी असे सांगत आहे. गेली दोन वर्ष अभ्यासक्रम ठप्प आहे. पण महापालिकेने ऑनलाईन तासिकांच्या नावाखाली निवासी डॉक्टरांकडून दोन लाख रुपये उकळण्यात आले. पण तरी एकही ऑनलाईन तासिका झाली नाही. आयकर विभागाच्या नियमांनुसार छात्रवृत्ती (स्टायपेंड) म्हणून मिळणाऱ्या वेतनावर कोणताही कर नसतो. महाराष्ट्रातल्या सरकारी महाविद्यालयांमध्येही असा कोणताही कर घेतला जात नाही. पण तरीही मुंबई महापालिका यातून १०% वसुली करते असा आरोप दीपक मुंढे यांनी केला आहे. होस्टेलची अवस्था अमानवी आहे. सायन हॉस्पिटलमध्ये जेव्हा लोकांनी लाईट, पंख्यांसारख्या साध्या गोष्टी दुरुस्त करायची मागणी केली तेव्हा सायन हॉस्पिटलचे डीन डॉक्टर मोहन जोशी यांनी त्यांना बाहेर काढले आणि स्वतःच्या खर्चाने गोष्टी दुरुस्त करायला सांगितल्या. डॉक्टरांना कोरोना वॅरियर्स म्हणतात पण त्यांना कोणताही भावनिक आधार दिला जात नाही त्यामुळे ७०% निवासी डॉक्टर्स हे कोविड स्ट्रेस डिसऑर्डर मधून जात आहेत. एकूण २५०० निवासी डॉक्टर्सपैकी ५०% पेक्षा अधिक डॉक्टर्सना कोविडने कचाट्यात घेतले पण वरिष्ठांकडून त्यांची साधी विचारपूसही केली नाही. अशा अनेक व्यथा त्यांनी मांडल्या आहेत.

त्यामुळे या गंभीर आरोपांच्या नंतर महापालिकेकडून नेमके काय उत्तर दिले जाते? या आरोपांची चौकशी होणार का ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Exit mobile version