भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या कसोटीपूर्वी बऱ्याच घडामोडी घडल्या. रोहित शर्माने या सामन्यात विश्रांती घेणार असल्याचा निर्णय घेतला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. रोहित शर्मा या मालिकेत अपयशी ठरल्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठत होती. तो या सामन्यात नसल्याबद्दल पहिल्या दिवसाच्या खेळानंतर ऋषभ पंतने आपल्या भावना व्यक्त केल्या.
ऋषभ पंत म्हणाला की, हा निर्णय रोहित शर्मासाठी भावनिक होता. तो भारतीय संघाचा नेता आहे. गेली अनेक वर्षे तो भारतीय संघाचा कप्तान म्हणून खेळत आहे. आम्हीही त्याच्याकडे आमचा नेता म्हणूनच पाहतो.
पंतने हे सांगितल्यानंतर यामागील कारण मात्र सांगण्यास त्याने नकार दिला. तो म्हणाला की, काही निर्णय असे असतात की, तुम्ही त्यात सहभागी नसता. संघव्यवस्थापनाचा तो निर्णय असतो. मी त्यातला भाग नाही. त्यामुळे यापेक्षा अधिक मी त्यावर बोलू शकत नाही.
पाचव्या कसोटीपूर्वी घडलेल्या घ़डामोडी धक्कादायक होत्या. भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये तणावाचे वातावरण आहे, अशा पद्धतीच्या बातम्या येत होत्या. संघप्रशिक्षक गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांच्यातही दुरावा असल्याचे बोलले गेले. गुरुवारी भारतीय संघाच्या सरावादरम्यान दोघे एकमेकांशी संवाद साधताना दिसत नव्हते अशाही बातम्या होत्या.
सामन्याआधी जी पत्रकार परिषद झाली त्यात कर्णधार बोलतो पण यावेळी गंभीरने ती पत्रकार परिषद घेतली मात्र त्याने रोहितच्या सहभागाविषयी काहीही भाष्य केले नाही.
बॉर्डर गावस्कर चषकासाठी ओळखल्या जाणाऱ्या या मालिकेत पाच डावात रोहित शर्माला १० पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. एकूण त्याने ३१ धावा केल्या. पहिल्या कसोटीतही तो घरगुती कारणामुळे संघनिवडीसाठी उपलब्ध नव्हता नंतर दुसऱ्या व तिसऱ्या कसोटीत तो मधल्या फळीत खेळला.
भारत १८५
रोहित या कसोटीत खेळत नसल्यामुळे गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे कर्णधारपदाची सूत्रे सोपविण्यात आली. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला आणि त्यांना अवघ्या १८५ धावा करता आल्या.
त्यात ऋषभ पंतने सर्वाधिक ४० धावा केल्या तर रवींद्र जाडेजाने २६ धावांची खेळी केली. स्वतः बुमराहने २२ धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघ दीडशेचा टप्पा ओलांडू शकला. दिवसाच्या अखेरच्या चेंडूवर बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाला बाद केले त्यामुळे ऑस्ट्रेलिया १ बाद ९ अशा स्थितीत आहे.