सुनील गावस्कर म्हणतात, ऋषभ पंत कसोटी कर्णधार म्हणून योग्य!

सुनील गावस्कर म्हणतात, ऋषभ पंत कसोटी कर्णधार म्हणून योग्य!

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याने शनिवार १५ जानेवारी रोजी कर्णधार पदाचा राजीनामा दिला. विराट कोहलीने अचानक राजीनामा दिल्याने क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली. मात्र, माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना विराटच्या निर्णयाचे आश्चर्य वाटले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. सुनील गावस्कर यांनी विराटने राजीनामा दिल्यावर ‘इंडिया टुडे’शी बोलताना असे वक्तव्य केले.

“मला विराटच्या राजीनामा देण्याच्या निर्णयाचे आश्चर्य वाटले नाही. खरंतर सामना संपल्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनी होते, तेव्हा विराट राजीनामा देईल, असे वाटत होते. पण, तेव्हा त्यांने हा निर्णय जाहीर केला असता, तर कुठल्यातरी रागातून हा निर्णय घेतलाय, असा संदेश गेला असता. त्यामुळे विराट २४ तास थांबला आणि त्यानंतर त्याने हा निर्णय जाहीर केला” असे सुनील गावस्कर म्हणाले.

विराट कोहली याने राजीनामा देताच आता भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार कोण असणार या चर्चांना सुरुवात झाली आहे. सुनील गावस्कर यांनी ऋषभ पंत याच्या नावाला पसंती दर्शवली आहे. “२४ वर्षांच्या ऋषभ पंतने मला प्रभावित केले असून त्याच्यावर कसोटी संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते,” असे गावस्कर म्हणाले.

“परदेशात मालिका हरणे हे बोर्ड आणि क्रिकेट चाहते दोघांकडूनही सहज स्वीकारले जात नाही. परदेशात मालिका गमावल्यानंतर कर्णधाराला पदावरुन हटवण्याचा धोका असतो. आधी सुद्धा हे घडले आहे, आता सुद्धा असे घडू शकले असते. कर्णधारपदावरुन आपल्याला हटवले जाईल, हा अंदाज विराटने बांधला असावा म्हणून त्याने कर्णधारपदाचा स्वत:हून राजीनामा दिला,” असे सुनील गावस्कर म्हणाले.

हे ही वाचा:

भारतीय लष्कराच्या लढाऊ गणवेशाची पहिली झलक

‘वडेट्टीवारांनी ‘फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं’ अशी राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था केली आहे’

किरण मानेचे मालिका निर्मात्यांवर नवे आरोप!

लेखक, संपादक आणि प्रकाशक अरुण जाखडे यांचे निधन

सुनील गावस्कर यांनी ऋषभ पंत याचे नाव सुचवले असले तरी के. एल. राहुल आणि रोहित शर्मा यांच्या नावांचीही कर्णधार म्हणून चर्चा आहे. दक्षिण आफ्रिकेमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात विराटच्या अनुपस्थितीमध्ये के. एल. राहुल याला कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती. तर विराट याने टी- २० संघाचे कर्णधार पद सोडल्यावर रोहित शर्मा याला संघाचे कर्णधार पद दिले तर आता वन- डे संघासाठीही रोहित शर्माकडेच कर्णधार पद सोपवण्यात आले आहे.

विराट कोहली याने १६ सप्टेंबर २०२१ रोजी टी- २० संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी विश्वकप स्पर्धेनंतर सोडणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर ८ डिसेंबर २०२१ रोजी बीसीसीआयने वन डे संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर १५ जानेवारी २०२२ रोजी विराटने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा केली.

Exit mobile version